जसा बाप तसा बेटा… आपल्या तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागच्या पावलांवर पाऊल त्याचा मुलगा आर्यवीर सेहवाग टाकतोय. गुरुवारी 200 धावांवर नाबाद असलेल्या सेहवागपुत्र आर्यवीरचे त्रिशतक अवघ्या 3 धावांनी हुकले. एवढेच नव्हे तर त्याची फेरारीही अवघ्या 23 धावांनी हुकली. त्याने सेहवागच्या 319 धावांना मागे टाकले असते तर त्याला बक्षीस म्हणून फेरारी देण्याचे वचन खुद्द वीरेंद्र सेहवागने दिले होते. आर्यवीरने कूचबिहार करंडक स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना मेघालयविरुद्ध 309 चेंडूंत 297 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. यात 51 चौकार आणि 3 षटकारांचाही समावेश होता.
आपल्या मुलांच्या झंझावाती खेळीचे काwतुक करणारी पोस्ट बाप वीरूने टाकली. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके ठोकण्याचा विक्रम करणाऱ्या सेहवागसारखाच त्याचाही मुलगा खेळतोय. म्हणून वीरूनेही आपल्या पोस्टमध्ये आपल्या मुलाचे कौतुक आणि अभिनंदन केलेय. गुरुवारी 200 धावांवर नाबाद असलेल्या आर्यवीरने आपले कसोटीतील 319 धावांचा आकडा मागे टाकल्यास फेरारी बक्षीसरूपाने देणार असल्याचे सांगितले होते. मेघालयविरुद्धचा खेळ पाहता तो 319 हा आकडा सहज पार करेल असे वाटत होता, पण त्रिशतकासमीप पोहोचताच त्याने संतुलन गमावले आणि त्याचे त्रिशतक साकारण्याचे आणि 319 धावा गाठण्याचे स्वप्नही थोडक्यात अधुरे राहिले. त्याची फेरारी 23 धावांनी हुकली असली तरी त्याने आपल्या वडिलांप्रमाणेच शतके, द्विशतके ठोकत राहावीत, असा आशीर्वाद दिला आहे. आर्यवीरच्या या खेळामुळे तो लवकरच आयपीएलमध्ये फटकेबाजी करताना दिसला तर आश्चर्य वाटणार नाही.