बारामती जिल्हा होणार? विखे पाटील स्पष्टच म्हणाले, अशा प्रकारच्या वावड्या कोण...file photo
Published on
:
22 Jan 2025, 4:27 am
Updated on
:
22 Jan 2025, 4:27 am
बारामती: राज्यात बारामतीसह अन्य जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याच्या चर्चेवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामतीत स्पष्टीकरण दिले. अशा प्रकारच्या वावड्या कोण उठवत आहे माहिती नाही, असे ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर जाण्यासाठी ते बारामती विमानतळावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते. विखे म्हणाले, बारामती जिल्ह्याबाबतचा कोणताही प्रस्ताव शासनापुढे नाही. अनेक वर्षे महसूलमंत्री म्हणून काम केले आहे. ना कधी अशा प्रस्तावाची चर्चा झाली, ना जिल्हानिर्मितीची चर्चा झाली. या सर्व बातम्या कपोलकल्पित आहेत, त्यात काहीही तथ्य नाही.
एक रुपयाचा पीक विमा बंद होणार असल्याबाबत विचारले असता विखे म्हणाले की, मला कळत नाही की कोण अशा वावड्या उडवत आहेत. शेतकर्यांसाठी एवढे मोठे बजेट येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले की, या सर्व बातम्या खोट्या आहेत. कोणीही नाराज नाही. शिंदे हे त्यांच्या गावी गेले म्हणून ते नाराज आहेत, असे कसे म्हणता येईल. ते नेहमी तिकडे जात असतात.