बुमराचा ऑस्ट्रेलियाला हादरा! खचलेल्या यंग इंडियाची पहिल्या दिवशी स्वप्नवत सुरुवात

4 hours ago 1

पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवसावर गोलंदाजांनीच हुकूमत गाजवली असली तरी कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटचीच टेस्ट लाभली. दोन्ही संघांतील वेगवान गोलंदाजच पहिल्या दिवसाचे विकेटधारी ठरले. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने खचलेल्या हिंदुस्थानच्या फलंदाजांनी पहिल्या दोन सत्रातच मान टाकली. हिंदुस्थानी संघ आणि चाहत्यांसमोर दिवसाचा अंधारी पसरली होती. अवघ्या 150 धावांतच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हिंदुस्थानची विकेट काढली. पण त्यानंतर हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराने बॉर्डरगावसकर (बॉगाक) करंडक स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा शेवट स्वप्नवत करताना यजमान ऑस्ट्रेलियाला असा हादरा दिला की, त्यांची 7 बाद 67 अशी केविलवाणी अवस्था होती. बुमराच्या साथीने सिराजराणाच्या माऱ्याने हिंदुस्थानला पहिल्या कसोटीत छोटीशी का होईना आघाडीची आशा जागवली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिन्ही कसोटींत टी-20 स्टाईलने खेळणाऱ्या हिंदुस्थानी फलंदाजांना पर्थवरही स्वतःला रोखता आले नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हंगामी कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फारच घातक ठरला. अंतिम अकरा खेळाडूंची केलेली निवडही काहीशी धक्कादायक ठरली. रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दिग्गज फिरकीवीरांना डावलून वॉशिंग्टन सुंदरची निवड आणि नितीश रेड्डी व हर्षित राणा या दोन्ही वेगवान गोलंदाजांची केलेली निवडही खटकणारी होती. संघात अनेक बदल करूनही पर्थवर हिंदुस्थानची आठव्या क्रमांकापर्यंत असलेली फलंदाजी दीडशेत कोसळल्यामुळे आघाडीवीरांचे अपयश पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आलेय.

बुमरा है ना

हिंदुस्थानचा डाव 150 धावांत आटोपल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराकडून सर्वांना अपेक्षा होती आणि त्याने नेहमीप्रमाणे अपेक्षांची पूर्ती केली. ज्या खेळपट्टीवर हिंदुस्थानी फलंदाजी ढेपाळली, त्याच खेळपट्टीवर बुमराच्या रॉकेट चेंडूंनीही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनाही उभे राहू दिले नाही. पदार्पणवीर नॅथन मॅकस्विनीला आपल्या दुसऱ्याच षटकात बाद करून बुमराने सनसनाटी सुरुवात केली आणि त्यानंतर तो जराही थांबला नाही. त्याने उस्मान ख्वाजाचाही अडसर दूर करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. पण पुढच्याच चेंडूवर स्टीव्हन स्मिथला पायचीत करत ऑस्ट्रेलियन डावाला हादरवले. बुमराला हॅटट्रिकची संधी होती, ट्रव्हिस हेडने ती होऊ दिली नाही.  मग पदार्पणवीर हर्षित राणाने आपले पहिले षटक भन्नाट फेकले आणि आपली निवड योग्य असल्याचे दाखवून दिले. त्यानेच ट्रव्हिस हेडचा त्रिफळा उडवत अवघ्या पर्थला शांत केले. पुढे मोहम्मद सिराजने मिच मार्शला बाद करून ऑस्ट्रेलियाची 5 बाद 38 अशी दारुण अवस्था केली. 52 चेंडू खेळून केवळ 2 धावा करणाऱ्या मार्नस लाबूशेनचा अडथळा सिराजने दूर केला आणि पॅट कमिन्सला पंतकडे झेलण्यास बुमराने बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी संपवण्याची शक्यता निर्माण केली. पण अॅलेक्स पॅरीने उर्वरित षटके खेळून काढत ऑस्ट्रेलियाची घसरण थांबवली. टी-20 क्रिकेटचे दुष्परिणाम ऑस्ट्रेलियन फलंदाजांवरही दिसले. त्यामुळेच पहिल्या दिवशी एकाही फलंदाजाला पन्नाशीही गाठता आली नाही. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पॅरी 19 धावांवर खेळत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया 7 बाद 67 अशा स्थितीत असून ते 83 धावांनी पिछाडीवर आहेत. अवघ्या 17 धावांत 4 विकेट टिपणाऱ्या बुमराला पुन्हा एकदा डावात 5 विकेटची संधी आहे.

पंतने खेळात जान आणली

के. एल. राहुलची विकेट पडली आणि हिंदुस्थान 4 बाद 47 वर पोहोचला. तेव्हा ऋषभ पंतने काही खणखणीत फटके ठोकत संघाला सावरण्याचा अपयशी प्रयत्न केला. पण त्याच्या खेळाने संघात जान आणली होती. संघात स्थान मिळवणाऱ्या ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदरकडून मदतीची अपेक्षा होती. पण हे दोघेही ऑस्ट्रेलियन माऱ्यापुढे उभे राहू शकले नाही. उपाहाराला 4 बाद 51 अशा स्थितीत असलेल्या संघाला पंत सावरेल, अशी चिन्हे होती, पण कुणीच त्याच्यासोबत उभा राहिला नाही. तेव्हाच पदार्पणवीर नितीश कुमार रेड्डीने पंतच्या साथीने जोरदार खेळ करत संघाला शंभरीपलीकडे नेले. पंत 37 धावांवर बाद झाला आणि ही भागी 48 धावांवर फुटली. त्यानंतर एकटय़ा नितीशने फटकेबाजी करत संघाला 150 धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने 6 चौकार आणि 1 षटकारासह 41 धावांची पदार्पणीय खेळी केली.

तिसऱ्या पंचांची घोडचूक

आधीच हिंदुस्थानची बिकट अवस्था होती. राहुल खेळपट्टीवर तग धरण्याचा प्रयत्न करत होता. त्याने दोन तासांच्या संघर्षमय खेळात 26 धावा केल्या होत्या. तेव्हाच स्टार्कच्या एका चेंडूवर यष्टीमागे झेल टिपल्याचे अपील पंचांकडे करण्यात आले. मैदानातील पंचांनी तो निर्णय अचूक ठरवण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि तिसरे पंच रिचर्ड इलिंगवर्थ  यांनी अव्वल दर्जाचे तंत्रज्ञान असूनही राहुलला बाद देण्याची घोडचूक केली. त्यांनी एकाच बाजूने स्निकोमीटर बघत स्टार्कचा चेंडू त्याच्या बॅटला चाटून गेल्याचे ठरवले आणि राहुलला बाद दिले. पण प्रत्यक्षात चेंडू बॅटला नव्हे तर बॅट पॅडवर आदळल्यामुळे आवाज आला होता. पंच इलिंगवर्थ यांना स्प्लिट स्क्रीन ह्यू पाहून निर्णय घ्यायला हवा होता, पण त्यांनी तो न पाहताच चुकीचा निर्णय दिला आणि हिंदुस्थानची अवस्था आणखीनच बिकट झाली. या निर्णयाबद्दल राहुलने तीव्र नाराजी व्यक्त केली. दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचकांनी पंचांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. या वादग्रस्त निर्णयाचा हिंदुस्थानला चांगलाच भुर्दंड सोसावा लागला.

अन् अपेक्षांची माती केली

हिंदुस्थानी संघाला फलंदाजी हवी होती आणि बुमराने टॉस जिंकून घेतली. संघातील अनाकलनीय बदल केवळ यशस्वी जैसवाल आणि विराट कोहलीच्या फॉर्मला पाहून केल्यासारखे वाटत होते, पण दोघांनीही घोर निराशा केली. यशस्वी सलामीला उतरला आणि ऑस्ट्रेलियातील आपल्या पहिल्याच डावात तो धावांचे खातेही उघडू शकला नाही. जैसवालची अयशस्वी सलामी पाहून सार्यांच्याच काळजा ठोका चुकला. तो बाद होत नाही तोच देवदत्त पडिक्कलनेही माती खाल्ली. संघात शेवटच्या क्षणी एण्ट्री करणाऱ्या पडिक्कलला संकटमोचक म्हणून संधी देण्यात आली होती, पण त्याने संधीची माती केली. तो पाऊण तास झगडत होता, चाचपडत होता, पण त्याला एकही धाव काढता आली नाही आणि तो शून्य धाव घेऊनच माघारी परतला. पुढे कोहलीचे विराट आगमन झाले. ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर सहा शतके ठोकणाऱ्या कोहलीच्या खेळावर अवघ्या हिंदुस्थानचे लक्ष होते. पण त्याच्या खेळाला नजर लागली. हेझलवूडचा एक अप्रतिम चेंडू त्याची विकेट घेऊन गेला. हल्ली विराटलाच अप्रतिम चेंडू पडतात, हे विशेष. विराट गेला आणि हिंदुस्थानची 3 बाद 32 अशी बिकट अवस्था झाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article