‘बेटी बचाओ, बेटी पढाओ'ची दशकपूर्तीनिमित्त रॅली:जिल्हाधिकारी कुंभार यांनी दाखवला हिरवा झेंडा; महिलांचा मोठ्या प्रमाणात होता सहभाग
2 hours ago
1
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित मोटरसायकल फेरी बुधवारी काढण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवा झेंडा दाखवून बाइक फेरीचा शुभारंभ केला. त्यात अनेक महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले. हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मुलगा- मुलगी असा भेदभाव न करता प्रत्येकाला समान हक्कांसह जगण्याची संधी मिळाली पाहिजे. याच हेतूने "बेटी बचाव बेटी पढाओ' उपक्रमात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शुभारंभ प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, बाल हक्क आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे आदी उपस्थित होते. अशी काढण्यात आली मोटरसायकल फेरी फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, शहर कोतवाली, माणेक चित्रगृह, संतोषी माता मंदिर, पंचायत समिती मार्गे जिल्हा परिषद कार्यालय येथे समारोप करण्यात आला. ऑटो युनियनचे सदस्यही मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शपथ कार्यक्रम व स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले. अशी करण्यात येत आहे जनजागृती लिंगभेद चाचणी पद्धतीला प्रतिबंध, मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन, त्यासाठी भरीव जनजागृती असा कार्यक्रम तालुका स्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी व अभय केंद्रांचे संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत राबवण्यात येत आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे यांनी दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)