काही महिन्यांपूर्वी देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपले मोबाईल प्लॅनचे दर वाढवले. याचा मोठा फटका या कंपन्यांना बसलाय. जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांचे सुमारे एक कोटीहून अधिक ग्राहक कमी झाले आहेत.
ट्रायने सप्टेंबर महिन्यासाठी ग्राहक डेटा जारी केला. ट्रायच्या आकडेवारीवरून असं दिसतंय की, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांची स्थिती खूपच टाईट आहे. सर्वात मोठा फटका मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला बसला आहे. रिलायन्स जिओचे सप्टेंबर 2024 मध्ये 79 लाख ग्राहक कमी झाले आहेत.
भारती एअरटेलने सप्टेंबर महिन्यात 14 लाख ग्राहक गमावले, तर सप्टेंबर महिन्यात 15 लाख ग्राहकांनी व्होडाफोन आयडिया सोडले. रिलायन्स जिओला एअरटेल आणि व्होडाफोन आयडियापेक्षा जास्त झटका बसल्याचे दिसून येतंय. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स जिओची 47.17 कोटी ग्राहक संख्या होती. ती सप्टेंबर महिन्यात 46.37 कोटी झाली आहे.
बीएसएनला फायदा
दरवाढीमुळे संतप्त युजर्स बीएसएनएलकडे वळत आहेत. कारण बीएसएनएलचे प्लॅन खूपच स्वस्त आहेत. रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलला पुन्हा लोकांचा विश्वास जिंकायचा असेल तर त्यांना पुन्हा स्वस्त प्लॅन घेऊन मार्केटमध्ये उतरावे लागेल. युजर्सना परवडतील असे नवीन प्लॅन टेलिकॉम कंपन्यांना लॉन्च करावे लागतील, जे कमी किमतीत चांगले फायदे देतील. ग्राहक गमावण्याऐवजी बीएसएनएलने सप्टेंबरमध्ये नेटवर्कमध्ये 8 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.