राज्यातील विधानसभा निवडणुकीचे एकतर्फी धक्कादायक निकाल लागल्यानंतर आता भाजपने ठाणे महापालिकेवर डोळा ठेवला आहे. एकीकडे अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी मिंधे गटाला डिवचण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीचा धुरळा अजूनही बसलेला नसताना भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय केळकर यांनी मिंधे गटाला थेट इशारा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मंगळवारी केळकर यांनी वसंत विहार येथील जानका देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी पालिका निवडणुकीवर भाष्य केले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ म्हणून अधोरेखित झाला आहे. भाजपचे नऊ तर मिंधे गटाचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी ‘हम करेसो’ म्हणत दादागिरी सुरू केली आहे.
जिल्ह्यात नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि उल्हासनगर अशा एकूण सहा महापालिका आहेत. त्यापैकी नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे, तर ठाणे महापालिकेत मिंधे गटाचा बोलबाला होता. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला राक्षसी विजय प्राप्त झालेला असताना मिंधे गटाच्या ताब्यात असलेली ठाणे महापालिका आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.