लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपी बस अपुर्याPudhari
Published on
:
27 Nov 2024, 4:28 am
Updated on
:
27 Nov 2024, 4:28 am
Pune News: पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीच्या ताफ्यात पुणे, पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीए भागातील लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी बस गाड्या आहे. या लोकसंख्येला अपुर्या बसगाड्यांमुळे पुणेकरांचे प्रचंड हाल होत असून, त्यांना बससाठी स्थानकावर तासनतास थांबावे लागत आहे.
यासोबतच गर्दीने भरलेल्या बसगाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. याकरिता नव्या सरकारने पीएमपीच्या ताफ्यातील गाड्या वाढवण्यासाठी आर्थिक मदत देऊन प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील बस संख्या पुणेकरांच्या लोकसंख्ये नुसार असणे आवश्यक आहे. याकरिता महापालिकेच्या सर्वंकश आराखड्यात त्याची माहिती देण्यात आली आहे. त्या आराखड्यानुसार 1 लाख लोकसंख्येसाठी 55 बस आवश्यक असतात. मात्र, पुण्याच्या लोकसंख्येसाठी आवश्यक तितकी बससंख्या पीएमपीकडे नाही. त्यामुळे पुणेकर प्रवाशांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी नव्या सरकारने प्रयत्न करायला हवेत, अशी मागणी होत आहे.
पीएमआरडीएसाठी स्वतंत्र व्यवस्थेचे नियोजन
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्येसाठी पीएमपीच्या ताफ्यात साडे-तीन हजार बसची आवश्यकता आहे. मात्र,पीएमपीकडे सध्या 1880 च बस आहेत. या बस पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी अपुर्या आहेत. असे असतानाही पीएमपीकडून आता संचलन तुटीच्या बदल्यात पीएमआरडीए भागातही बससेवा सुरू करण्यात आली आहे.
यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात आणखीनच बस कमी पडायला लागल्या आहेत. यामुळे पीएमपी प्रशासनाने पीएमआरडीए भागाच्या मार्गांचे, प्रवासी संख्येचे स्वतंत्र नियोजन करून, पीएमपीच्याच नियंत्रणात स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे, अशी मागणी पीएमपी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
सर्व प्रथम नव्या सरकारने 2017 पासून प्रलंबित असलेला वाहतूक धोरण आराखडा मान्य करावा. पीएमपी सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या सर्वंकश वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करावी. तसेच, राज्यशासनाने पीएमपीला नव्या बस खरेदीसाठी निधीची मोठी भरीव तरतुद करावी. प्रवाशांसाठी बस गाड्या अपुर्या पडत आहेत. त्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
- संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच