चार पत्रकारांवर गुन्हा दाखलFile Photo
Published on
:
27 Nov 2024, 6:45 am
Updated on
:
27 Nov 2024, 6:45 am
उल्हासनगर : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची एका टेम्पो मधून बेकायदा वाहतूक करणार्या चालकाला मारहाण करत टेम्पो मालकिणीच्या घरात घुसून दोन लाखाची खंडणी मारणार्या चार पत्रकारांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे गुन्हा दाखल झालेल्या पत्रकारांनीही खंडणीचा गुन्हा दाखल करणार्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या परस्पर दोन्ही कडून झालेल्या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करणार्या गीता आहुजा (वय 40) ह्या उल्हासनगर कॅम्प नंबर 4 भागात राहतात. गुन्हा दाखल असलेल्या पत्रकार सुदाम चंद्रभुवन यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका टेम्पो मधून गुटख्याची बेकायदा वाहतूक करणार्या टेम्पो चालकाला गीता अहुजा यांचा जावई डिंगरा आहे असे समजून रवी बेदी या चालकाला अडवून त्याला मारहाण करत टेम्पो मधील गुटखावर कारवाई करणार असल्याची धमकी दिली. तसेच 22 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गीता अहुजा यांच्या घरात घुसून दोन लाख द्या नाही तर तुमच्या विरोधात आमच्या वर्तमान पत्रात बातमी प्रसिद्ध करतो, अशी धमकी दिली.
दरम्यान, 23 नोव्हेंबर गीता आहुजा यांनी चारही पत्रकारांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 329 (4), 308 (2) , 115(2), 324 (2) 351(2), 3 (5) प्रमाणे सुदाम खारकर, चंद्रभुवन विश्वकर्मा, अभिषेक शिगवन आणि मीनल पवार यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तर गुन्हा दाखल असलेल्या पत्रकारांनीही गीता आहुजा व त्यांच्या साथीदाराविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. तसेच गुन्हयाचे गंभीर प्रकरण असल्याने पोलिसांनी योग्य दिशेनं तपास सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे करीत आहेत. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या चारही पत्रकार हे पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.