परभणी/गंगाखेड/खळी(Parbhani) :- जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाणी वितरिकेमध्ये गंगाखेड तालुक्यातील खळी शिवारात मोठ्या प्रमाणात गाळ, झाडे, झूडपे आणि गवत वाढल्याने या भागातील शेतकऱ्यांना जायकवाडीचे पाणी मिळणे दुरापस्त झाले असुन कालव्याच्या वितरिकेची दुरुस्ती करून गाळ, झाडे, झूडपे आणि गवत काढून पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.
दुरुस्ती करून पाणी सोडण्याची मागणी
चालू वर्षाच्या पावसाळी हंगामात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी धरण पाण्याने भरले आहे. रब्बी हंगामात पिकांना जायकवाडी धरणातील पाणी मिळेल या आशेवर खळी शिवारातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामातील ज्वारी व हरभरा पिकांची पेरणी करून गव्हाचे पिक घेण्यासाठी शेताची मशागत केल्याने रब्बीच्या पिकामध्ये यावर्षी मोठी वाढ झाली आहे. जायकवाडीच्या नियोजन शून्य कारभारामुळे डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे आवर्तन उशिरा येत असल्यामुळे शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याची वाट पहावी लागत आहे. यातच कालव्याच्या वितरिकेमध्ये जागोजागी गाळ साचून झाडे, झुडपे आणि गवत वाढल्यामुळे कालव्यात पूर्ण दाबाने पाणी येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. जायकवाडीच्या विभागाकडे अनेक वेळा मागणी केल्यानंतर ही कालव्यातील गाळ, झाडे, झुडपे आणि गवत काढण्यात आले नसल्याने कालव्यातून वाहणारे पाणी हे शेतकऱ्याच्या शेतासह रस्त्यावरून वाहत असल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) तात्काळ कालव्याची दुरुस्ती करून पाण्याचे नियोजन करत कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.