Published on
:
27 Nov 2024, 10:44 am
Updated on
:
27 Nov 2024, 10:44 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात माझ्या लाडक्या भावाची जी ओळख निर्माण झाली, ती कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आम्ही अनेक निर्णय घेतले. अडीच वर्षांच्या कामावर खूष आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही, तर लढणारे आहोत. असे स्पष्ट करत शेवटच्या श्वासापर्यंत राज्यातील जनतेसाठी काम करेन. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जो निर्णय घेतली, तो निर्णय मान्य असेल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
राज्यात महायुतीला ऐतिहासिक २३३ जागा मिळालेल्या आहेत. स्पष्ट बहुमत असताना महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर दुसरीकडे शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. दरम्यान, भाजपने शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. त्याचबरोबर महत्त्वाची खाती देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, त्यांनी ही ऑफर नाकारल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गुरूवारी बैठक होणार आहे. यावेळी शहा शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.