महायुतीचा मुख्यमंत्री कोण होईल, यावर गेल्या दोन दिवसांपासून खल सुरू आहे. महायुतीचा सीएम कोण असा सवाल करण्यात येत होता. शिवसेना आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचा दावा करण्यात येत होता. या घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे यांनी तातडीने ठाणे येथे त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी महायुतीला इतकी भरभरून मतं का पडली, याचं गुपीत उघडं केले. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत त्यांचे मत सुद्धा जाहीर केले. काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मला वेदनांची जाणीव
मी भाषणात आई आणि पत्नीचा विषय मांडला. ते कसं घर चालवायचे. काटकसर कशी करायचे हे मी सांगायचो. पण माझ्याकडे काही अधिकार आला तर या सर्वांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे असं मला वाटत होतं. महिला असतील किंवा रुग्ण असतील यांच्यासाठी काही ना काही करायचं होतं. त्या परिस्थितीतून गेल्यावरच या गोष्टी कळतात. मी गरीब कुटुंबातून आल्याने मला या वेदना समजत होत्या. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून मी त्या गोष्टी केल्या, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
सर्वसामान्यांच्या जीवनात बदल केला
महिला आणि लाडक्या भावांसाठी आम्ही काम केलं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही पैसे वाटत होतो म्हणू न आम्हाला विरोध होत होता. पण आम्ही मागे पाहिलं नाही. आम्ही अडीच वर्षात आम्ही काम केलं . काही तरी देऊ शकलो याचं समाधान आहे. आम्हाला मोदी आणि शाह यांचं पूर्ण पाठबळ होतं. आम्ही सरकार बदललं आणि उठाव केला तेव्हा अमित शाह म्हणाले चट्टान की तरह आपके पिछे खडे आहे. ते अडीच वर्ष माझ्या पाठी होते. मला सुरुवातीचे दिवस आठवतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक दिवसाचा वापर राज्यासाठी केला, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
का पडला मतांचा पाऊस?
राज्य आणि केंद्र सरकार समविचारी असते तेव्हा राज्याच्या प्रगतीचा वेग गतिमान होतो. त्यामुळे अडीच वर्षाच्या काळात मी समाधानी आहे. मी काही डिटेल्समध्ये जाणार नाही. पण आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या सरकारने असे निर्णय घेतले नव्हते. आम्ही सर्वांबाबत निर्णय घेतले. कुणाचेही प्रश्न ठेवले नाही. सिंचनाच्या १२४ प्रकल्पांना आम्ही मान्यता दिल्या. पूर्वी चार प्रकल्पांना मान्यता मिळायच्या. राज्याच्या प्रगतीचा वेग मोठा होता. आम्ही राज्य एक नंबरला नेण्याचं काम केलं, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्य एक नंबरला होतं. महाविकास आघाडीच्या काळात तीन नंबरला होतं. आम्ही सहा महिन्यात नंबर वनला आणलं. या निवडणुकीत जो मतांचा वर्षाव झाला, तो केवळ आणि केवळ आम्ही जे काम केलं, निर्णय घेतले आणि जी सकारात्मकता दाखवली. त्यामुळे आमच्यावर मतांचा पाऊस पडला असा दावा शिंदे यांनी व्यक्त केला. लाडक्या बहिणीचा सख्खा लाडका भाऊ ही माझी ओळख झाली. बाकीचे सावत्र भाऊ झाले, असे ते म्हणाले.