लातूर (Latur):- शाळेतील कर्मचाऱ्याचे पद कायम ठेवण्यासाठी महत्वाची असलेली पटसंख्या वाढवून दाखविण्यासाठी त्या-त्या शाळांशी संगनमत करून आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या टी. सी. पालकांच्या परस्पर दुसऱ्या शाळांना देणाऱ्या हरंगुळ खुर्द जि.प. शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापक अण्णा नरसिंगे याचा पालक व ग्रामस्थांनी पर्दाफाश केला. संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकल्यानंतर शिक्षण विभागाने (Department of Education) खडबडून जागे होत मुख्याध्यापक नरसिंगे यांस तडकाफडकी निलंबित केले.
हरंगुळ ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मुख्याध्यापक निलंबित.!
शहरालगत असलेल्या हरंगुळ खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अण्णा श्रीरंग नरसिंगे यांनी आपल्या कार्यकाळात जवळपास नऊ मुलांच्या टी.सी.पालकांच्या परस्पर लातूर, नांदगाव येथील खाजगी शाळांना दिल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर या मुख्याध्यापकांवर कारवाई (action) व्हावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली. मात्र संस्थाचालकधार्जिण्या शिक्षण विभागाने प्रकार पाठिशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. याप्रकरणी कांहीच कारवाई होत नसल्याने अखेर संतापलेल्या पालकांनी बुधवारी (दि.२७ नोव्हेंबर) शाळा चालू देणार नाही, असा पवित्रा घेत शाळेस टाळे ठोकले. जोपर्यंत मुख्याध्यापकावर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा दिला.
पालकांचे म्हणणे ऐकून घेत सदर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई
ही बाब लक्षात घेत लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकरी वंदना फुटाणे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकरी व पालकांचे म्हणणे ऐकून घेत सदर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधकारी फुटाणे यांनी सदरच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली खरी, मात्र जिल्ह्यातील इतर खाजगी शाळांमधील पदे वाचविण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खेळ करणारे मुख्य सूत्रधार कोण आणि किती आहेत? याचा शोध घेण्याची गरज असल्याची चर्चा जाणकारांतून केली जात आहे.