Published on
:
27 Nov 2024, 3:05 pm
Updated on
:
27 Nov 2024, 3:05 pm
नवी दिल्ली : शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यात महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दल निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. दरम्यान, बुधवारीच दुपारी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला मोठा विजय मिळाला. या विजयानंतर चार दिवस उलटूनही महायुतीने मुख्यमंत्री कोण असेल, हे जाहीर केले नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. निवडणूक झाल्यानंतर ही पहिलीच भेट होती, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. पटेल, तटकरे यांची भेट झाल्याच्या काही काळानंतर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांचे शिष्टमंडळही अमित शाह यांच्या भेटीला गेले. एकनाथ शिंदे यांची मुंबईत पत्रकार परिषद सुरू असतानाच दिल्लीत ही भेट झाली. शिंदे गटाच्या खासदारांनीही ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना वाटते की, एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवावे. काही नेत्यांनी तसे बोलूनही दाखवले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्ट केले की ते उद्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह दिल्लीत येणार आहेत आणि अमित शाह यांच्याशी भेटून चर्चा करणार आहेत. त्यामुळे या भेटीत फार काही घडू शकले नाही.
शिंदे गटाच्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, मिलिंद देवरा, संदीपान भुमरे, रविंद्र वायकर, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.