भारतीय रेल्वेत अपघातांचे प्रमाण मोठे आहे. मानवी चुकांमुळे किंवा तांत्रिक कारणाने ट्रेनचे टक्कर होऊन अनेक मोठे अपघात होत असतात, त्यात दरवर्षी हजारो प्रवाशांचे बळी जात असतात. रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेल-एक्सप्रेसची टक्कर टाळण्यासाठी टक्कर विरोधी यंत्रणा ‘कवच’ बसविण्याचे काम सुरु आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने पावले उचलली असून रोज २०० इंजिनात ही ‘कवच’ यंत्रणा बसविण्याचे टार्गेट आहे. हे काम जर याच वेगाने झाले तर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर ही यंत्रणा लागण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.
भारतीय रेल्वे झिरो ट्रेन एक्सिडेंट आणि झिरो ट्रेन डिरेलमेंटचे टार्गेट ठरविले आहे.अलिकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की कवच-४ यंत्रणेला लोकोमोटीव्ह ( रेल्वे इंजिन ) मध्ये आणि रेल्वे रुळांवर बसविण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे. येत्या सहा वर्षांत संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कवर ही यंत्रणा सुरु होईल असेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
६८ वर्कशॉपमध्ये काम सुरु
रेल्वेच्या ६८ लोकोमोटीव्ह मेन्टेनन्स वर्कशॉपमध्ये कवच-४ इंस्टॉल करण्याचे काम होत आहे. पुढील सहा वर्षांत हे काम पूर्ण होईल असे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे. आधी लोकोमोटीव्हमध्ये कवच यंत्रणा बसविण्यासाठी सुमारे पंधरा दिवस लागत होते. आता हे काम सहा दिवसात होत आहे. आता केवळ २२ तासांत एका लोकोमोटीव्हमध्ये कवच-४ यंत्रणा बसविली जात आहे.प्रत्येक वर्कशॉपमध्ये रोज १० ते १२ लोकोमोटीव्ह मध्ये कवच इंस्टॉल करण्याची क्षमता आहे. मात्र कामगार आणि इतर कारणांवर ते अवलंबून आहे.
हे सुद्धा वाचा
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार रेल्वेकडे एकूण १८ हजार इलेक्ट्रीफाईज लोकोमोटीव्ह आहेत, येत्या दोन वर्षात दहा हजार लोकोमोटिव्हला कवच यंत्रणा बसविण्याची योजना आहे.तर त्यानंतर चार वर्षांत देशातील सर्व इलेक्ट्रीफाईड लोकोमोटिव्ह आणि देशातील इलेक्ट्रीफाईड रेल्वे ट्रॅकवर कवच-४ यंत्रणा लागली जाणार आहे. इलेक्ट्रीफाईड लोकोमोटीव्ह जर मेन्टेनन्ससाठी लोको वर्कशॉपमध्ये ( २४ तासांपेक्षा जास्त काळ ) आला तर त्याला लागलीच कवच-४ यंत्रणा बसवूनच बाहेर काढावे असे आदेश दिलेले आहेत.
एका इंजिनला कवच यंत्रणेचा किती येतो खर्च
रेल्वेने सध्या १५ हजार किमी रेल्वे मार्गावर कवच यंत्रणा बसविण्यासाठी टेंडर काढले आहे. यासाठी नऊ हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेली आहे.आतापर्यंत एक हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकवर कवच यंत्रणा बसवलेली आहे. यात मुंबई, बडोदा आणि दिल्ली ते पलवल मार्गांचा समावेश आहे. एका लोकोमोटीव्हला कवच यंत्रणा लावण्याचा खर्च ८० लाख रुपये खर्च होतात. प्रति किलोमीटर रेल्वे ट्रॅकवर कवच इंस्टॉल करण्याचा खर्च ६० लाख रुपये आहे.
कसे काम करते कवच?
कवच सिस्टीमला रेल्वे रुळ आणि इंजिन दोन्ही जागी लावायला लागते.जेव्हा कवच यंत्रणा बसवलेली ट्रेन कवच यंत्रणा लावलेल्या ट्रॅकवरुन जाते तेव्हा सेंसरमुळे ट्रेनचा वेग आणि स्थान आदीची माहिती कळते. तसेच समोरुन येणाऱ्या ट्रेनची देखील सर्व माहिती कळते. दोन्ही ट्रेनचा वेग आणि कमी अंतर आदी पाहून कवच यंत्रणा आपोआप दोन्ही ट्रेन रोखते. सध्या लोको आणि रुळांना कवच बसवण्याचे काम सुरु आहे. रेल्वेने कवच यंत्रणेच्या तीन आवृत्त्यात सुधारणा करुन १६ जुलै २०२४ रोजी कवच-४ यंत्रणा शोधली आहे. आता सर्व ठिकाणी कवच-४ ही यंत्रणा बसविली जात आहे.