प्रेम प्रकरणातून तरुणावर महंतेशनगरमध्ये गोळीबार झाला.
Published on
:
27 Nov 2024, 6:07 pm
Updated on
:
27 Nov 2024, 6:07 pm
बेळगाव : प्रेम प्रकरणातून तरुणावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ऑटोनगर येथे घडली. प्रणित कुमार (वय 31 राहणार अयोध्या नगर टिळकवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हल्लेखोर गोळी मारून पसार झाले असून घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की प्रणित कुमार हा एम आर असून तो मित्रांनी जेवायला बोलावल्याने ऑटो नगर परिसरात गेला होता. तिकडून परतत असताना काही अज्ञात इसमांनी अचानक येऊन त्याच्यावर गोळ्या दोन झाडल्या. यापैकी एक गोळी त्याच्या काना जवळून गेली, तर दुसरी पायाला लागल्याचे समजते. यामध्ये तो जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. प्रणित कुमार याचे एका तरुणी सोबत प्रेम प्रकरण असल्याने यातूनच त्याच्यावर गोळीबार झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. घटनेची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, माळमारुती ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आधी घटना घडलेल्या ठिकाणी गेले. सदर तरुणाला जिल्हा रुग्णालयात आणल्याचे समजल्यानंतर तेथेही भेट दिली. सदर तरुणावर उपचार करून त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होता. त्यामुळे गोळीबार नेमका कोणी केला व किती जण होते, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच प्रणित कुमारचे मित्र आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. तो मूळचा कारवारचा असून, आईसोबत तो अयोध्यानगरमध्ये राहतो, अशी माहिती त्याच्या चुलत भावाने दिली आहे.