जनतेनेच काँग्रेसला नाकारले, ईव्हीए विषयावरून भाजपची टीकाFile Photo
Published on
:
27 Nov 2024, 4:49 pm
Updated on
:
27 Nov 2024, 4:49 pm
नवी दिल्ली : जनतेनेच काँग्रेसला नाकारले आहे. त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधी रडगाणे बंद करावे, असा सणसणीत टोला भाजपने लगावला. महाराष्ट्रात जनतेने भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही भाजपप्रणित युतीला मते देत काँग्रेसला जनतेनेच नाकारले, अशीही टीका भाजपने केली.
विरोधक निवडणुकीतील पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडत असताना भाजपने विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पात्रा म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेतल्या जाव्यात, असे वक्तव्य केले. मात्र मुळात जनतेनेच काँग्रेसला नाकारले आहे. त्यामुळे ईव्हीएम विरुद्धचे रडगाणे काँग्रेस आणि विरोधी पक्षाने बंद करावे. तसेच मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की विविध समाज घटकांची मत ईव्हीएम द्वारे वाया जातात. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य करून लोकांचा अपमान केला, असेही पात्रा म्हणाले.