आर्वी येथील विद्युत उपकेंद्रातील महापारेषणच्या रोहित्रास भीषण आग लागली. Pudhari Photo
Published on
:
27 Nov 2024, 4:30 pm
Updated on
:
27 Nov 2024, 4:30 pm
वर्धा : आर्वी येथील 132 केवी विद्युत उपकेंद्रातील महापारेषणच्या रोहित्रास भीषण आग लागली. त्यात रोहित्र जळाल्याने आर्वी शहरासह काही भागाचा विद्युत पुरवठा काही तास बंद झाला. जवळपास तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ही घटना बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
येथील 132 केवी विद्युत उपकेंद्रातून आर्वी शहरासह विविध भागांना विद्युत पुरवठा केला जातो. येथील 25 एंपियर मेगाव्होल्ट रोहित्राला अचानक आग लागली. सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास रोहित्राला आग लागल्याची बाब निदर्शनास येताच धावपळ सुरू झाली. आग लागलेल्या रोहित्रावरून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे या रोहित्रावरून विद्युत पुरवठा होणाऱ्या आर्वी शहरासह गावांचा विद्युत पुरवठा ठप्प झाला. अग्नीशमन दलाच्या मदतीने तीन तासांच्या प्रयत्नांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती आहे. आगीमुळे रोहित्रचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आग लागल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिकांची येथे गर्दी झाली होती. जवळपास तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आर्वी शहरासह विविध भागाचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणच्या वतीने इतर ठिकाणावरून नियोजन करत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते.