Published on
:
27 Nov 2024, 4:53 pm
Updated on
:
27 Nov 2024, 4:53 pm
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर आज (दि.२८) मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज (गुरुवारी) दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. दिल्ली दौऱ्यावर असताना ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदासह सत्ता स्थापनेचे सूत्र ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाले. त्यानंतर आजपर्यंत मुख्यमंत्री पदाबद्दल निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे याची उत्सुकता शिगेला पोहोचली. मात्र आज होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपमधून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. अनेक नेत्यांनी जाहीरपणे तशी इच्छाही व्यक्त केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
बैठकीत सत्ता स्थापनेचे सूत्रही ठरणार?
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन प्रमुख पक्ष आहेत. मागील अडीच वर्षे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. त्यानंतर आता भाजपाचे मुख्यमंत्री असतील. या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांना किती आणि कोणती मंत्रिपदे द्यायची, यावरही आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.