एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य राहील. भाजपच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा राहील, असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच त्यांच्या पुढील कामाविषयी त्यांनी अभी तो सारा आसमान बाकी है… या शायरीतून सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर त्यांना पुढील भूमिका काय असणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शायरीतून उत्तर दिले. जीवन में असली उड़ान अभी बाकी है,
अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन,
अभी तो सारा आसमान बाकी है… एकनाथ शिंदे म्हणाले, मी महायुतीतील घटक आहे. आम्हाला मोठे बहुमत मिळाले आहे. आम्हाला मिळालेले बहुमत जितके मोठे आहे, तितकीच आमची जबाबदारी देखील वाढली आहे. यापुढे महायुती म्हणून काम करायचे आहे. आम्ही खूप काम केले आहे. आम्ही केलेले काम तुमच्या समोर आहे. यापुढेही महायुती म्हणून आणखी काम करत राहणार आहोत. अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपला ‘फ्युचर प्लॅन’ सांगितला. मी लोकप्रियतेसाठी काम केलेले नाही
एकनाथ शिंदे यांनी आपण लोकप्रियतेसाठी काम केले नसल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, लोकांना वाटते की मुख्यमंत्री आपल्यातलाच आहेत. घर असो, मंत्रालय असो, लोक येतात, भेटतात. मी प्रत्येकाला भेटतो. मला जी ओळख मिळाली ती तुमच्यामुळेच. मी लोकप्रियतेसाठी काम केले नाही, महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले. अडीच वर्षे केंद्र सरकार पाठीशी उभे राहिले. राज्याला पुढे न्यायचे असेल, तर केंद्र सरकारचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. मोदींकडून मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावाची घोषणा
महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही आपला मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. त्यामुळे आता महायुतीला आपला नवा कारभारी घोषित करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)