Published on
:
27 Nov 2024, 1:00 pm
Updated on
:
27 Nov 2024, 1:00 pm
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेत बुधवारी कामकाज होऊ शकले नाही. दोन्ही सभागृहात काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी संभल, मणिपूर आणि अदानी प्रकरणातील हिंसाचारावर चर्चेची मागणी करत गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या मागणीकडे आणि गोंधळाकडे दुर्लक्ष करून प्रश्नोत्तराचा तास चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ वाढत असल्याचे पाहून सभागृहाचे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावेळी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी 'संभलच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, फाशी द्या' अशा घोषणा दिल्या. पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी आवश्यक कागदपत्रे सभागृहात मांडली. त्यांनी विरोधी सदस्यांना त्यांच्या जागी जाण्यास सांगितले. मात्र त्याचा विरोधी खासदारांवर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज गुरुवारी, ११ वाजेपर्यंत तहकूब केले.
त्याचवेळी, राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी अदानी, उत्तर प्रदेशातील संभलमधील हिंसाचार, मणिपूर आणि दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गदारोळ घातला. सभापती जगदीप धनखड यांनी सकाळी साडेअकरापर्यंत स्थगिती दिली. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ सुरू झाला. धनखड यांनी खासदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र त्याचा विरोधकांवर काहीही परिणाम झाला नाही. विरोधकांचा गदारोळ पाहून राज्यसभेचे कामकाज गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.