महायुती सरकारच्या प्रचंड विजयानंतर शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी प्रथमच पत्रकार परिषद घेतले. यावेळी त्यांनी सरकार स्थापनपासून जनतेच्या मिळालेल्या प्रेमापर्यंत सर्व मोकळ्यापणाने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधल्याचे सांगितले. महायुतीचे सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
अडीच वर्षांत मी जी कामे केली त्यावर मी समाधानी आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. लढणारे लोक आहोत. आम्हाला इतका मोठा विजय मिळाला आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. कारण आम्ही जीव तोडून मेहनत केली. आम्ही लोकांमध्ये गेलो. घरी बसलो नाही. आम्ही जे केले ते लोकांसाठी केले. रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करेल. मला काय मिळाले, त्या पेक्षा जनतेला काय मिळाले हा आमचा उद्देश होता. लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना फायदा झाला हे महत्त्वाचे आहे. त्यांनी मला लाडका भाऊ ही पदवी दिली, तेच महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘कॉमन मॅन’ म्हणून काम केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी कधी स्वत:ला मुख्यमंत्री समजलो नाही. ‘कॉमन मॅन’ म्हणून काम केले. मी नेहमी तसाच राहिला. त्यामुळे मला प्रोटोकॉलचा अडथळा आला नाही. मला नेहमी केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळेच आम्हाला अनेक योजना आणता आल्या. महिला आणि लाडक्या भावांसाठी आम्ही योजना आणली. शेतकऱ्यांसाठी योजना आणली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने केला. आम्ही अडीच वर्षांत राज्यातील जनतेसाठी प्रचंड काम केले.
हे सुद्धा वाचा
गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या प्रगतीचा वेग मोठा होता. यापूर्वी महाविकास आघाडीने बंद केलेली कामे आम्ही सुरु केली. आम्ही राज्य एक नंबरला नेण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. माझ्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आमच्या सर्व आमदारांनी कामे केली. या सर्वांच्या मेहनतीमुळे राज्य एक नंबरला गेले. महाविकास आघाडीच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य आम्ही सहा महिन्यात नंबर एकवर आणले, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले.