Published on
:
27 Nov 2024, 6:42 am
Updated on
:
27 Nov 2024, 6:42 am
तालुक्यातील जांबुत बुः येथील देवराम मेंगाळ यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना काल मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत मेंगाळ यांच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. तर छपरातील झोळीत झोपलेल्या लहान बाळाला वेळेत बाहेर काढल्याने अनर्थ टळला.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, साकूर पठार भागातील जांबुत बुः येथील वैतागवाडी या ठिकाणी देवराम आप्पाजी मेंगाळ सहकुटुंब राहतात. दररोज ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. मंगळवारी(दि.26) दुपारी कामानिमित्त देवराम मेंगाळ हे बाहेर गेले होते. घरी एक महिला व छोटं बाळ होतं. दरम्यान दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक छपराच्या घराला आग लागली. काही कळायच्या आतच संपूर्ण छप्पराने पेट घेतला.
आग लागल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत संपूर्ण घरातील संसारच जळून खाक झाले. आग लागली तेव्हा छपरातील झोळीत छोटं बाळ झोपलेले होते. याबाबतची माहिती मिळताच संतोष शेटे यांनी जीवाची पर्वा न करता छपरात जावून त्यास बाहेर काढले. यामुळे बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
दरम्यान, या आगीने देवराम मेंगाळ यांचे छप्पर व आतील संसारपयोगी साहीत्य नष्ट झाले. मेंगाळ कुटुंबावर मोठं संकट कोसळल असून सरपंच, पोलिस पाटील ग्रामस्थांनी शासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी केली आहे.