Published on
:
27 Nov 2024, 6:46 am
Updated on
:
27 Nov 2024, 6:46 am
नाशिक | नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी आक्षेप घेतला असून, मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅटच्या सखोल तपासणीची मागणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. विहित शुल्क अदा केल्यानंतर एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के मतदान केंद्रांतील मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटची तपासणी करता येणार आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगास प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना पत्राद्वारे कळविले आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे बडगुजर यांचा ६८ हजार १७७ मतांच्या फरकाने पराभव झाला. सीमा हिरे यांना १ लाख ४१, ७२५ मतं मिळाली तर, बडगुजर यांना ७३ हजार ५४८ मतं मिळाली. या निकालावर बडगुजर यांनी आक्षेप घेत नाशिक पश्चिम मतदारसंघातील १२९ मतदान केंद्रांचे ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर आणि व्हीव्हीपॅटची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी संबंधित मतदान केंद्रांची यादीही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केली आहे. दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटची तपासणी करता येणे शक्य असल्याचे नमूद करत त्यासाठी विहित शुल्क अदा करण्याची सूचना केली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या दि. १ जून २०२४ रोजीच्या पत्रानुसार उमेदवारांना ईव्हीएम मायक्रोकंट्रोलर आणि व्हीव्हीपॅटच्या सखोल तपासणीची मागणी करताना एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के केंद्राची तपासणीची मागणी करता येते. त्यासाठी विहित नमुन्यात निकाल घोषित झाल्यापासून सात दिवसांत निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो.
प्रती मतदान यंत्रासाठी ४७,२०० खर्च
मतदान यंत्रांच्या सखोल तपासणीसाठी निवडणूक आयोगाने शुल्क निर्धारित केले आहे. त्यानुसार प्रती ईव्हीएम सेट अर्थात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रांच्या तपासणीसाठी ४० हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी याप्रमाणे ४७ हजार २०० रुपयांचे शुल्क निवडणूक आयोगाकडे जमा करावे लागते.
नाशिक पश्चिम मतदारसंघातील निकाल संशयास्पद आहे. अनेक मतदान केंद्रांतील यंत्रे परस्पर बदलण्यात आल्याचे आपण मतमोजणीपूर्वीच पत्रकार परिषदेत सांगितले होते. मतदान आणि मतमोजणीतील आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळेच आपण या निकालावर आक्षेप घेत मतदान यंत्रांच्या सखोल तपासणीची मागणी केली आहे.
- सुधाकर बडगुजर, उमेदवार, शिवसेना ठाकरे गट