Published on
:
27 Nov 2024, 6:32 am
Updated on
:
27 Nov 2024, 6:32 am
नेहमीच्या वादातून पतीने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशातून तिच्यावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात घडली. दरम्यान, या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे.तिच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. तर पोलिस ठाण्यात पती, सासू व दिर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीचा पोलिस तपास करत आहेत.
या घटनेची माहिती अशी की, मोमीन आखाडा (ता.राहुरी) येथील नारायण बाजीराव चव्हाण व मंदा नारायण चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. पती नारायण हा पत्नी मंदा यांना चारित्र्याच्या संशयावरून वेळोवेळी शिविगाळ, मारहाण करीत होता. याबाबतची माहिती विवाहीतेचा भाऊ भगवान दादाराज जाधव रा. वाघोली हवेली जि. पुणे यांना फोनवर बहिण मंदा यांनी दिली होती.
दरम्यान, घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वीच मंदा ह्या भावाकडे गेल्या होत्या. दिवाळी सणाला गेल्यानंतर त्यांनी पत्नीकडून चारित्र्याच्या संशयातून होणारा छळ सांगत माहेरीच राहण्याचा निर्णय घेतला. परंतु पती नारायण जाधव, सासू रुख्मीणी बाजीराव चव्हाण व भाया हरीभाऊ बाजीराव चव्हाण यांनी वेळोवेळी संपर्क साधत मंदा चव्हाण यांना नांदण्यासाठी पाठवून द्यावे, अन्यथा तुमच्याकडे पाहून घेऊ अशी दमबाजी केली. तिघांनी मंदा चव्हाण यांच्यावर व जाधव कुटुंबियांवर दबाव आणला. त्यानंतर मंदा चव्हाण या नांदण्यासाठी मोमीन आखाडा येथे आल्या होत्या. त्यानंत्तरही पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला.
25 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या वेळी पती नारायण चव्हाण यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नी मंदा हिस घरात जबर मारहाण केली. तसेच चाकूने वार करीत डोक्यात वेळोवेळी दगड मारत रक्तभंबाळ केले. ती बेशुद्व अवस्थेत असताना तिला तशीच घरात सोडून त्याने दरवाजा बंद करून पळ काढला. दरम्यान, मुलगी गायत्री ही शाळेतून घरी आल्यानंतर तिने दरवाजाची कडी उघडली. आई घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तीने आरडाओरडा केला. मामा भगवान जाधव यांना संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगतच्या ग्रामस्थांनी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मंदा चव्हाण यांना रुग्णालयात दाखल केले. सिव्हील हॉस्पिटल अहिल्यानगर येथून त्यांना पुणे येथील ससूण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुरी पोलिस ठाण्यात पीडित विवाहीतेचा भाऊ भगवान जाधव यांच्या तक्रारीनुसार पती नारायण चव्हाण, सासू रुख्मीणी चव्हाण, भाया हरीभाऊ चव्हाण दोघे रा. सोनई ता. नेवासा या तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण हा पसार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले आहे. दरम्यान, याप्रकरणाती सासू व भाया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपीला आमच्या ताब्यात द्या; नातेवाईक आक्रमक
मंदा चव्हाण यांच्या नातलगांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. जीवघेणा हल्ला करणार्या नारायणला पकडून आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी नातलगांनी केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नातलगांची समजूत काढली. पीडित विवाहीतेच्या कुटुंबियांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली.