मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरूfile photo
Published on
:
28 Nov 2024, 6:21 am
Updated on
:
28 Nov 2024, 6:21 am
राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच आता मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी पुण्यातील आमदारांनी फिल्डिंग लावली आहे. आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, राहुल कुल हे मुंबईतच ठाण मांडून असून, नक्की कोणाच्या पदरात मंत्रिपदाची माळ पडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
शनिवारी मतमोजणी झाल्यानंतर महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या नेत्यांचा आदेश मान्य असेल असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता भाजपचाच मुख्यमंत्री असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानुसार आता मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची यासंबंधीची तयारी सुरू झाली. त्यामुळे पुण्यातील इच्छुक आमदारांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
प्रामुख्याने सलग चार टर्म विजयी झालेल्या आमदार माधुरी मिसाळ या गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. तर अनुसूचित जाती प्रवर्गातून आमदार सुनील कांबळे आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार राहुल कुल हे ही मुंबईतच आहे. याशिवाय भोसरीचे आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचेही नावे चर्चेत असून, आपल्या नेत्यांकडे मंत्रिपदासाठी या आमदारांचे लॉबिग सुरू आहे.
भाजपकडून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिपद निश्चित असल्याने ते पुण्यातच आहेत, तर आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे.