पश्चिमचा गड कोण राखणार? : शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पश्चिम या राखीव मतदार संघातून अनेकांनी कंबर कसली आहे. त्यात नुकतेच भाजपमधून उबाठा गटात गेलेले माजी नगरसेवक राजू शिंदे आघाडीवर आहेत. पक्षाने त्यांना संधी दिली, तर मतदार संघात थेट लढत होण्याची शक्यता आहे. याच मतदार संघातून उबाठा गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही संधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
भोकरमधून कोण ? : नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण काँग्रेसच्या तिकिटावर २००९ मध्ये निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण, २०१९ मध्ये स्वतः अशोक चव्हाण विजयी झाले. आता त्यांची कन्या श्रीजया चव्हाण याच पारंपरिक मतदार संघातून विधानसभेच्या तयारीला लागल्या आहेत. त्यांना भाजपकडून संधी मिळेल का, भाजपच्या उमेदवार म्हणून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, याबद्दल उत्सुकता आहे.
पैठणमध्ये भाऊगर्दी माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदार संघातून त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना शिंदे गटाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. एकाच घरात खासदार आणि आमदार असावेत, अशी भुमरे यांची व्यूहरचना आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास उबाठा गटाचे सचिन घायाळ आणि दत्तात्रय गोर्डे इच्छुक आहेत. भुमरे यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्याविरुद्ध तालुक्यात सर्व निष्ठावान
शिवसैनिक एकवटले आहेत. तरीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली. मात्र, तालुक्यातील वातावरण अजूनही भुमरे यांना अनुकूल आहे, असे मानता येत नाही. या पार्श्वभूमीवर विलास भुमरे यांनाही चांगलीच झुंज द्यावी लागणार आहे