मराठवाड्याच्या राजधानीत कोण किंगमेकर? फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील गट पहिल्यांदाच आमने-सामने, भाजप- काँग्रेसचे कुठे जड पारडे?

2 hours ago 1

मराठवाड्याची राजधानी असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा अनेक सांस्कृतिक चळवळींचे आंदोलनांचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक विचारधारा एकाच प्रवाहात वाहतात. जातीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि आंदोलनाची किनार असलेला हा जिल्हा राज्यात एकमेव म्हटला तरी वावगं ठरणार नाही. अनेक ऐतिहासिक खाणाखुणा अभिमानाने मिरवणाऱ्या या जिल्ह्यात आधुनिकतेने पण शिरकाव केला आहे. शेंद्रा पंचतारांकित आणि ऑरिक सिटी या दोन औद्योगिक वसाहती या शहराची जागतिक नकाशावर नवी ओळख करू पाहत आहेत. मराठवाडा हा तसा शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला, त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भागीदारी पण उल्लेखनीय होती. पण दोन वर्षांपूर्वीच्या फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट मैदानात आले आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणूक 2024 वर दिसून येईल.

जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ

मराठवाड्याची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या छत्रपती संभा76जीनगरात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. कधीकाळी शिवसेनेचा अभेद्य गड असणाऱ्या या जिल्ह्यात आता सत्ता समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात पूर्व, पश्चिम आणि मध्य ही तीन मतदारसंघ आहेत. शेजारी पैठण, फुलंबी, सिल्लोड, कन्नड, गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघ आहेत.

हे सुद्धा वाचा

20 नोव्हेंबर रोजी मतदान

राज्यात एकाच दमात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. जिल्ह्यात या पूर्वीच्या विधानसभेच्या प्रारूप यादीच्या तुलनेत 86,308 मतदार वाढले आहेत. आता जिल्ह्यात मतदारसंख्या 31 लाख 76 हजार 197 इतकी झाली आहे. यामध्ये नवमतदारांचा आकडा 78,577 इतका आहे.

मतदारसंघ निहाय मतदारांची आकडेवारी

वैजापूर : 3,18,465 गंगापूर : 3,61,218 पैठण : 3,23,500 फुलंब्री : 3,65,755 कन्नड : 3,30,740 सिल्लोड : 3,55,230 मध्य : 3,66,057 पश्चिम : 4,02,894 पूर्व : 3,52,338

छत्रपती संभाजीनगर करणार औरंगाबादला मतदान

राज्य सरकारने मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलली. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव अशी आता त्यांची ओळख आहे. पण लोकसभेप्रमाणाचे या विधानसभा निवडणुकीत शहराचे नाव कायम आहे. त्यानुसार, तीन मतदारसंघांची नावं कायम राहतील. त्यात औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम अशी नावं कायम असतील. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील नागरीक औरंगाबाद विधानसभा मतदारसंघासाठी मतदान करतील.

आता बालेकिल्ला कुणाचा?

प्रत्येक निवडणुकीत जातीय, धार्मिक समीकरणं बदलतात. मतदार संख्या जास्त होते. राजकीय मुद्दे आणि गुद्दे बदलतात. पण यंदाच्या निवडणुकीचं चित्र वेगळं आहे. पूर्वी बंडखोर, पक्षातंर्गत विरोधक ही डोकेदुखी होती. राज्यातील दोन प्रमुख पक्षात फुट पडल्यानंतर आता प्रत्येक मतदारसंघात कधीकाळी पक्षासाठी खांद्याला खांदा लावून काम करणारी नेतेच एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे. त्यामुळे बालेकिल्ला कुणाचा हे घोडा और मैदान आमने-सामने असल्याने लवकरच समोर येईल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. पण 2019 च्या निवडणुकीत एमआयएमने पहिल्यांदा येथे सुरूंग लावला. महापालिकेत पण एमआयएमने जोरदार मुसंडी मारली. पण आता पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे शिवसेनेतील दोन गटात मतदारसंघ खेचून आणण्याची चुरस दिसेल. तर त्यात एमआयएमला मतांची बेगमी ओढण्याची संधी आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लढाईत एमआयएम डाव साधू शकते.

फुलंब्री विधानसभेत हरिभाऊ बागडे यांचा दबदबा होता. ते आता राजस्थानचे राज्यपाल झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा उत्तराधिकारी कोण हा याचे उत्तर लवकरच समोर येईल.पैठणमध्ये विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांच्या ऐवजी कुणाला तिकीट मिळणार आणि कोणता गट वरचढ ठरणार याची चर्चा सुरू आहे. कन्नडने अनेक पक्षांना बळ दिले. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि आता उद्धव सेना असा पक्षीय बदल दिसला. वैजापूर आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा शिलेदार तोच राहणार की जनता नवीन चेहरा देणार याची चर्चा रंगली आहे.

सिल्लोड मतदारसंघात विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांचा करिष्मा कायम आहे. जनतेचा आमदार अशी छबी तयार करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम या तीन मतदारसंघात खरा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. त्यातही मराठा दलित आणि मुस्लीम मतदार काय करामत दाखवता यावर येथील उमेदवारांचं नशीब ठरणार आहे. या तीनही मतदारसंघात मुस्लीम, मराठा समीकरण दिग्गजांना जेरीस आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागा वाटपात कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो आणि तिथे काय समीकरणं जुळवून येतात हे लवकरच समोर येईल. त्यात अनेक राजकीय पंडितांची अंदाजपंची, पोपटपंची उघड पडेल. तूर्तास उमेदवारांमध्ये उत्सुकता नाही त्याहून अधिक उत्सुकता मतदारांमध्ये आहे हे निश्चित.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article