महादेव जानकरांचा पहिला उमेदवार बारामतीतून?:शरद पवारांच्या विरोधात घेतली होती 1 लाख मते आता अजित पवारांना आव्हान? कोणाचा फायदा, कोणाचे नुकसान?

1 day ago 2
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर बारामतीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या यादीत बारामतीच्या उमेदवाराचे नाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जानकर यांच्या पक्षाची 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी निवडणुकीसाठी युतीविरोधातच दंड थोपटले आहेत. वास्तविक महादेव जानकर यांना राज्यपाल नियुक्त यादीत विधान परिषदेवर वर्णी लावू, असे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र आता या यादीत नाव नसल्याने जानकर नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी युती मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या आधी परभणी लोकसभा मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महादेव जानकर राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक होते. त्यासाठी महायुतीने विचारात न घेतल्याने महादेव जानकर नाराज आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपच्या नेतृत्वाखालील NDA म्हणजेच महायुतीसोबत संबंध तोडले आहेत. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बुधवारी आपला पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. रासप राज्यातील सर्व 288 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. अशा परिस्थितीत रासपच्या एनडीएपासून फारकत घेतल्याने कोणाचा फायदा होणार? कोणाला फटका बसणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. जागांसाठी सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, रासपने स्वतःला दूर केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वी त्यांच्या पक्षाशी कोणतीही चर्चा न झाल्याने महादेव जानकर एनडीएवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावरून मंथन सुरू आहे. अशा स्थितीत त्यांना बाजूला ठेवण्यात आल्यामुळे त्यांनी महायुतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच विधान परिषदेवर वर्णी लावण्याची त्यांची मागणीही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ रासप महायुतीत सामील होणार नाही किंवा महाविकास आघाडीमध्ये जाऊन निवडणूक लढणार नाही, असा निर्णय महादेव जानकर यांनी घेतला. अशा स्थितीत रासप एकटाच लढणार हे स्पष्ट असून जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे म्हणत त्यांनी या आधीच दावेदारी केली होती. रासपने निवडणुकीबाबत भूमिका व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कांशीराम यांच्यासोबत राजकीय कारकीर्दीला सुरुवात महाराष्ट्राच्या राजकारणात दलित, शोषित, ओबीसींची राजकीय लढाई लढण्यासाठी महादेव जानकर यांनी कांशीराम यांच्यासोबत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. कार्यकर्ता म्हणून ते बहुजन समाज पक्षाशी निगडीत होते, पण नंतर त्यांनी बसपापासून फारकत घेतली. 2003 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने निवडणूक लढवत आहेत, मात्र त्यांना अद्याप फारसे राजकीय यश मिळालेले नाही. 30-35 जागांवर प्रभाव टाकण्याची ताकद महाराष्ट्रात शरद पवारांचे राजकीय गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रासपचा राजकीय पाया आहे. रासप प्रमुख महादेव जानकर हे धनगर समाजातील आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे एक कोटी आहे, जी राज्याच्या 11.2 कोटी लोकसंख्येच्या 9 टक्के आहे. असे मानले जाते की सुमारे 40 टक्के धनगर लोकसंख्या पूर्णपणे पशुपालन आणि शेतीवर अवलंबून आहे. धनगर समाज अत्यंत मागास वर्गात येतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात धनगर समाज राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी सुमारे 30-35 जागांवर निवडणूक निकालांवर प्रभाव टाकण्याची ताकद त्यांच्या समाजाकडे आहे. सध्या धनगर समाजातील महादेव जानकर आणि गोपीचंद पडळकर हे दोन मोठे नेते आहेत. महादेव जानकर यांनी या आधी शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यांचा पक्ष 2004 पासून आपले नशीब आजमावत आहे. शरद पवारांच्या विरोधात 1 लाख मते रासपला महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे यश मिळाले नसले तरी अनेक राजकीय पक्षांच्या जागा पाडण्याची ताकद त्यांच्यात आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी 2009 मध्ये महाराष्ट्रातील माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवून एक लाख मते मिळवली होती. 2009 मध्ये, रासपने 26 जागा लढवल्या, एक जिंकली आणि पाच जागांवर तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यांना एकूण 187126 मते मिळाली. यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत रासपला प्रत्येकी एक आमदार जिंकण्यात यश आले. निवडणुकीच्या रणधुमाळीत महादेव जानकर यांनी ज्या प्रकारे महायुतीसोबत राजकीय संबंध तोडले, त्यामुळे अनेक जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा राजकीय खेळ बिघडू शकतो. 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत धनगर समाजाचे मोठे मत भाजपच्या नेतृत्वाखालील युतीकडे गेले आहे, पण आता जानकार यांनी माघार घेतल्याने विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बिघडू शकतात. रासप भाजपपासून का वेगळे का झाले? 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि रासप यांच्यातील संबंध बिघडले होते, परंतु 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकत्र आले. जागावाटपात योग्य मान न मिळाल्याने रासप आता पुन्हा वेगळे झाले आहे. जर रासप आता एकट्याने निवडणूक लढवत असेल तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाची मते मिळवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असेल. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला त्यांचा मार्ग सुकर वाटत आहे. महादेव जानकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अशा परिस्थितीत शरद पवार यांना जानकरांना महाविकास आघाडीत प्रवेश मिळवून देण्यात यश आल्यास महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर राजकीय समीकरणे बदलतील. अशा प्रकारे धनगर समाजाच्या मतांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार का? हे आता पहावे लागेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article