महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली:राजकीय पक्षांचा वाढता आकडा काळजीचा, 1995 सारखे अपक्ष तर बाजी मारणार नाहीत?

1 day ago 1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होईल. त्यानंतर 2 दिवसांनी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार अस्तित्त्वात येण्याचा मार्ग मोकळा होईल. विश्लेषकांच्या मते, यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अत्यंत रोचक लागतील. त्यामुळे राज्यात कुणाचे सरकार बनणार? कोण मंत्री होणार? आणि किंगमेकरची भूमिका कोण बजावणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडल्या आहेत. यावेळी महायुती व महाविकास आघाडीतील घटकपक्षांसह इतर पक्षांची तिसरी आघाडीही निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीचा निकाल 1995 च्या विधानसभा निवडणुकीसारखा लागेल की काय? अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत. वास्तविक, यावेळी निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे. पण इतरही अनेक पक्ष या आघाड्यांचा खेळ बिघडवू शकतात. महायुतीविषयी बोलायचे झाले तर या आघाडीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत तिसरी आघाडी याशिवाय तिसरी आघाडी म्हणजे 'परिवर्तन महाशक्ती'. गत 19 सप्टेंबर रोजी या आघाडीचा जन्म झाला. या आघाडीत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अपक्ष आमदार बच्चू कडू आणि काही छोट्या पक्षांचा समावेश आहे. या पक्षांव्यतिरिक्त राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएम हे ही पक्षही बहुतांश मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करणार आहेत. 2019 मध्ये आघाडीला बसला होता झटका 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांच्या आघाडीमुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मोठा धक्का बसला होता. या आघाडीने राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर निवडणूक लढवली. त्यात ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद येथे एकच उमेदवार उभा केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आंबेडकरांच्या पक्षाचा प्रचार केला. याचा परिणाम असा झाला की, वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही, पण अनेक जागांवर त्यांच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला. अनेक जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यंदा हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. पण या दोन्ही पक्षांच्या कामगिरीचा विधानसभा निवडणुकीच्या अंतिम निकालावर परिणाम पडेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. 1995 च्या निवडणुकीत अपक्षांचा होता वरचष्मा 1995 च्या विधानसभा निवडणुकीची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात रंजक निवडणुकांमध्ये गणती होते. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि भाजपशिवाय अपक्षांचाही डंका वाजला होता. खरे तर 1995 च्या निवडणुकीत काँग्रेसला 80, शिवसेनेला 73, भाजपला 65 आणि जनता दलाला 11 जागा मिळाल्या होत्या. त्याचबरोबर या निवडणुकीत एक-दोन नव्हे तर तब्बल 45 अपक्ष निवडून आले होते. याशिवाय महाराष्ट्र विकास काँग्रेसचा 1, नाग विदर्भ आंदोलन समितीचा 1, समाजवादी पक्षाचे 3, माकपचे 3 आणि शेतकरी व कामगार पक्षाचे 6 उमेदवार निवडून आले होते. यामुळे या पक्ष आणि अपक्षांच्या जागांचा आकडा 59 वर पोहोचला होता. राजकीय विश्लेषकांच्या मते, त्यावेळी अपक्ष कोणत्या पक्षात जाणार किंवा ते कुणाला पाठिंबा देणार? याविषयी अटकळींचा महापूर वाहत होता. पण अखेरीस अपक्षांनी आपली ताकद भाजप-शिवसेनेच्या युतीच्या पदरात टाकले आणि राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर शिवसेनेचे नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये अनेक अपक्षांना मंत्रीपदे मिळाली होती. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत रंजक झाली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article