रोजगार नसल्याने अनेकांनी सुरू केला प्रवासी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय:वाहतुकीची कांेडी ४ हजार रिक्षांची गरज असताना प्रत्यक्षात धावतात १० हजार
3 days ago
1
शहराचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या विचार घेता शहरात चार हजार ऑटोरिक्षा असावेत, असे एक परिमाण आहे. मात्र, शहरात ऑटोरिक्षांची संख्या उदंड म्हणजे निर्धारित परिमाणाच्या अडीचपट सुमारे १० हजारांवर झाली आहे. त्यामुळे चार ऑटोरिक्षा उभ्या राहण्याच्या जागेवर आता १० ऑटोरिक्षा थांबत असल्याने शहरातील वर्दळीच्या चौकात वाहतुकीची शिस्त बिघडली आहे. परिणामी शहरातील वर्दळीच्या चौकात वाहनांची कोंडी होणे, हे नित्याचेच झाले आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यानेच रिक्षा वाढल्याचे दिसत आहे. शहरातील गांधी चौक, खुले नाट्यगृह, फतेह चौक, टॉवर चौक, महंमद अली चौक, मध्यवर्ती बस स्थानक, स्टेशन चौक, जयहिंद चौक, महाकाली चौक, लक्झरी बस स्टँड चौक, वाशीम बायपास, रेल्वे स्टेशन चौक, अकोट फाईल, अकोट स्टँड परिसर आदी चौकात तसेच शहरात इतरत्रही रिक्षाचालकांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे विविध मार्गावर दिवसभर अधूनमधून वाहतुकीची कोंडी होत असते. शहरातील अति वर्दळीच्या बाजारपेठेकडे जाणाऱ्या गांधी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहापासून वाहतुकीची कोंडी सुरु होते ती सिटी कोतवालीपर्यंत कायम राहते. धान्य किराणा आणि भाजीबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या दुर्गादेवी परिसरात तर सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. एकमेकांना लोटलाट करत या मार्गावरून जावे लागते. या कोंडीत रस्त्याच्या कडेला प्रवासी भरण्यासाठी रिक्षाचालक अनधिकृतपणे थांबतात त्यामुळे तेथे अनेकदा वाहनाचा धक्का लागल्याने किरकोळ वाद होणे, ही बाब नित्याचीच झाली आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर बेशिस्तपणे रिक्षा, चारचाकी वाहने तसेच अन्य खासगी वाहने भर रस्त्यात उभी केली जात असल्याने अन्य वाहनांना वारंवार कोंडीचा सामना करावा लागत आहे. अधिकृत थांबा सोडून प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षाचालक वाट्टेल तेथे रिक्षा उभ्या करून प्रवासी घेण्याची चढाओढ करताना दिसून येतात. रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभे केल्याने मागील वाहने थांबतात आणि वाहतुकीची कोंडी होत असते. हे नित्याचेच झाले आहे. मात्र ,परिसरातील मुजोर रिक्षाचालक कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून येते. तसेच बस स्थानकाभोवती रिक्षाचालकांचा नेहमी गराडा पडलेला असतो. मात्र, त्यांच्यावर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई होत नाही. शिस्त मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई शहरात आधीच पेट्रोल, गॅस (सीएनजी) रिक्षांची संख्या शहराच्या मानाने जास्त आहे. त्यात आता बॅटरीवर चालणाऱ्या ई- रिक्षांचीही भर पडली आहे. एकूणच वाहनांची संख्या वाढल्यामुळेही वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. शहरात वर्दळीच्या भागात पेट्रोलिंग पॉइंट लावले आहेत. बाजारपेठ भागात वाहतूक पोलिसांतर्फे गस्त घालून ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना दिल्या जात आहेत. ‘नो पार्किंग’मध्ये तसेच रस्त्यात उभ्या वाहनांसह रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. त्यांना दंड आकारला जात आहे. -सुनील किनगे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा. बाजारपेठ, गांधी चौकात ‘ट्रॅफीक जाम’ नित्याचीच बाजारपेठ असलेल्या गांधी रोड परिसर तर सायंकाळी सहानंतर रिक्षा आणि वाहनांच्या गर्दीने फुलून जातो. त्यात सुसाट वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन रस्त्याच्या मधोमध आडवे- तिडवे वाहन चालवत जाणारे दुचाकीस्वार यांच्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होते. या गर्दीतून बाजारात जाणाऱ्या वाहनचालकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. दुर्गादेवी मंदिरासमोर गांधी चौकात शहर वाहतूक विभागाने एका वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही वाहतुकीची कोडी दूर करण्यात त्याच्या नाकी नऊ येत आहेत. वाहतूक पोलिस असेपर्यंत रिक्षाचालक तेथे थांबत नाही. दुपारी वाहतूक पोलिस तेथून गेला की पुन्हा रिक्षांचा गराडा तिथे उभा राहतो.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)