शेवगाव-पाथर्डीत आ. मोनिका राजळेंचा डंकाPudhari
Published on
:
27 Nov 2024, 7:46 am
Updated on
:
27 Nov 2024, 7:46 am
रमेश चौधरी
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आ. मोनिका राजळे यांचाच बोलबाला झाला. सलग तिसर्यांदा निवडून येण्याचा हा उच्चांक विरोधकांना आत्मचिंतन करणारा ठरला. राजळे यांना विरोधकांनी केलेले लक्ष्य आणि पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी सोडलेली साथ यावर मात करून केवळ मतदारांनी मतातून टाकलेल्या विश्वासाने त्यांचा विजय झाला आहे.
कुणाची हार कुणाचा विजय या निवडणूक काळात चाललेल्या चर्चेला अखेर आ. मोनिका राजळे यांच्या विजयाने पूर्णविराम मिळाला. निवडणुकीस वेगवेगळ्या बाजूने रंग देण्यात आला. विकासावर आरोप झाले, टीका करण्यात आल्या तर निवडणुकीपुरते राजकारण याचे भान हरपल्याने पातळी सोडून भाषणबाजी झाली. मात्र, या सर्व गोष्टीला मतदारांनी मतातून उत्तर दिले. जातीपातीला थारा न देता लाडकीने लाडकीच पाहिली. त्यामुळे एक नारी सब पे भारी झाली.
अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची राजकीय धरसोड आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तालुक्यातील मतदारांच्या विश्वासावर शेवटच्या टप्प्यात निवडणूक लढविण्याचा झालेला निर्णय त्यांना घातक ठरला. विजय आपलाच असा भास झालेल्या अनेक भाऊ कार्यकर्त्यांमुळे काही मतदारांनी भाऊंना कधीच सोडले होते. मात्र, याची गुप्तता पाळण्यात ते यशस्वी झाले. घुले निवडणुकीत उतरले आता निवडणुकीला रंगत येणार अशी चर्चा होती. या चर्चेतील रंगत याचा अर्थ कार्यकर्त्यांनी भाऊंना कळूच दिला नाही. एकनिष्ठ सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घुलेंच्या विजयासाठी जिवाचे रान केले. मात्र, दुटप्पींनी झोल केला. त्यामुळे घुलेंना शेवगाव तालुक्यातच अपेक्षित मते मिळाली नाहीत. परिणामी त्यांना तिसर्या स्थानावर जावे लागले.
लोकसभा निवडणुकीत खा. निलेश लंके यांना मतदारांनी दिलेली साथ व नवीन निर्माण झालेल्या कार्यकर्त्यांची फळी, तसेच तीन पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे यांना निवडणुकीत सहानुभूती होती. त्यात मराठा मतांची विभागणी, तर दुसरीकडे एक गठ्ठा मतांची बेरीज करण्यात आली. मात्र, निवडणुकीत त्याचा वेगळाच परिणाम झाल्याचे दिसून आले. अॅड. ढाकणे यांना शेवगाव तालुक्यातून हवी तशी मते मिळाली नाही. पाथर्डी तालुक्याने काहीशी साथ दिल्याने ते दुसर्या स्थानावर राहिले आणि राजळे- ढाकणे लढत दिसून आली.
आ. राजळे यांना उमेदवारी मिळू नये यापासून त्यांचा पराभव कसा होईल याचा स्वकियांनी प्रयत्न केला असला, तरी ऐनवेळी हे कार्यकर्ते एका बाजूला, तर मतदार राजळेंच्या मदतीला गेले. कमालीची नम्रता पाळत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका न करता केलेली विकासकामे, शासकीय योजना, लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराने आ. राजळे यांनी गावागावात मतदारांशी संपर्क केला. सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांनी फक्त राजळे यांनाच टार्गेट केल्याचे बहुतांशी मतदारांना जाणवले. मात्र, याची पर्वा न करता विकासाच्या मुद्यावर बोलणार्या राजळेंबाबत वाढत गेलेली सहानुभूती मतदारांनी मतातून प्रगट केल्याने आ. मोनिका राजळे तिसर्यांदा विजयी झाल्या.
काही उमेदवारांनी तर मतमोजणीदिवशी गुलाल आपलाच या विश्वासाने विजय मिरवणुकीची तयारी केली होती; परंतु त्यावर पाणी फिरले गेले आणि पराभवाची छाया दिसताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी ठिकाणावरून काढता पाय घेतला.