Published on
:
17 Nov 2024, 8:52 am
Updated on
:
17 Nov 2024, 8:52 am
नागपूर : Maharashtra Assembly Polls | शरद पवार बोलण्यासाठी केवळ जातीयवादी नसल्याचे सांगतात, मात्र ते स्वतः त्याच पद्धतीचे राजकारण करतात, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. व्होट जिहादच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी शनिवारी फडणवीस यांना लक्ष्य केले होते. पुण्यात विशिष्ट समाज विशिष्ट व्यक्तीला मतदान करतो तो 'व्होट जिहाद' नाही का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. व्होट जिहादसाठी नोमानी सारख्या व्यक्तींच्या मागण्या मान्य करणारे महाविकास आघाडीचे नव्हे, तर महायुतीचेच सरकार राज्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामे व लोकोपयोगी योजनांमुळे जनतेत हा विश्वास दिसत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
नागपुरातील दक्षिण पश्चिम या त्यांच्या परंपरागत मतदार संघात आज निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपण्यापूर्वीच्या शेवटच्या रविवारी त्यांनी तिसरा रोडशो केला. रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते. दक्षिण पश्चिम नागपूर विशेषता जयताळा परिसरात झालेल्या विकास कामांमुळे आज आमचे उत्स्फूर्त स्वागत पाहायला मिळाले. मी फारसा प्रचारात नसलो तरी हा माझा परिवार आहे. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांच्या भागात आज देवेंद्र फडणवीस यांनी रोडशो करीत जनतेचे आशीर्वाद मागितले. या भागात विजय राऊत व इतर आमचेही अनेक प्रतिष्ठित सहकारी असल्यावर त्यांनी भर दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करताना हिंदुत्वावर जे कोणी बोट ठेवतील त्यांचा आम्ही संघटीतपणे मुकाबला करणार, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
यावेळी अमृता फडणवीस, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, संदीप जोशी, विजय राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आज रोड शोच्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा मोठे शक्तिप्रदर्शन केले. ठिकठिकाणी फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुसरीकडे काँग्रेस उमेदवारांसाठी प्रियंका गांधी रोड शो करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विदर्भातील सभा रद्द झाल्याने भाजपमध्ये असलेली नाराजी या रोडशोने काहीशी दूर केली.