शिंदे गटाचे उमेदवार काँग्रेसच्या संपर्कात:भाजपने अपक्षांना पाठिंबा दिल्याने नाराज असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोठा दावा

5 hours ago 1
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे अनेक उमेदवार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यातच पटोले यांनी हा दावा केल्यामुळे महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कुणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी शिवसेनेचे अनेक उमेदवार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. शिंदेंचे अनेक उमेदवार काँग्रेसच्या संपर्कात भाजप धोका देण्यात पटाईत पक्ष आहे. त्यांनी अनेक मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्यास नकार दिला होता. त्यामुळे शिंदे गटाचे लोक भाजपवर नाराज आहेत. हे उमेदवार भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास उत्सुक नाहीत. ते आमच्या संपर्कात असून, आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पटोले पुढे म्हणाले, आज मध्यरात्रीनंतर शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी होण्याची गरज आहे. महायुतीत मोठ्या गडबडी सुरू आहेत. ते कोणतेही पाप करू शकतात. त्यामुळे संपूर्ण रात्र व सकाळपर्यंत आम्ही चौफेर नजर ठेवणार आहोत. काही ठिकाणी आमच्यात अतितटीची लढाई आहे. तिथे काही अधिकारी गडबड करण्याची भीती आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. उद्या रात्रीपर्यंत सत्ता स्थापन करण्याचा दावा सादर करणार महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल. ही स्थिती टाळण्यासाठी 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सर्वच आमदारांना तत्काळ मुंबईत आणले जाणार आहे. वेळ कमी असल्याने यासंबंधी योग्य ती तजवीज केली जाईल. उद्या दुपारपर्यंत निकाल आल्यानंतर तातडीने सर्व आमदारांना मुंबईत बोलावून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील. त्यानंतर शनिवारी रात्रीच राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा सादर केला जाईल, असे पटोले यांनी यावेळी सांगितले. फॉर्म 17 सी भाग 2 ची मागणी दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जाहीर होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून फॉर्म 17 सी भाग 2 सह इतर काही दस्तावेजांची मागणी केली आहे. निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदी अन्वये मतमोजणी टेबलवर फेरीनिहाय मतमोजणी झाल्यावर फॉर्म 17 सी मोजणी प्रतिनिधीची सही घेवून मोजणी पर्यवेक्षक निवडणूक निर्णय अधिकारी यांना देतो. त्या अगोदर त्याची दुय्यम प्रत मोजणी प्रतिनिधी यास किंवा उमेदवार प्रतिनिधी यास त्वरित देण्यात यावी. तसेच फेरीनिहाय तक्ता हा फॉर्म 17 सी भाग 2 वरून सहायक निवडणूक अधिकारी तयार करतो, तो परिशिष्ट 57 च्या तक्त्याची दुय्यम प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी. ही कायदेशीर तरतूद असून याद्वारे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक झाली किंवा नाही हे समजून घेण्यास मदत होईल. मताचे संकलन फॉर्म 20 मध्ये काटेकोरपणे झाले आहे की नाही हे उमेदवार प्रतिनिधीला प्राप्त फॉर्म 17 सी भाग 2 तसेच फेरीनिहाय तक्त्यावरून होवू शकते. या कायदेसंमत बाबी ध्यानात घेवून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना आपल्या स्तरावर या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना द्याव्यात, असे पटोलेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article