पालघरच्या शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. अशोक धोडी यांचा मृतदेह गुजरातमधील एका खाणीत सापडला आहे. पण त्यांची हत्या नेमकी कोणी केली? त्याचा मृतदेह गुजरातमध्ये कसा?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा संघटक अशोक धोडी यांची हत्या झाल्याचे समोर आले. २० जानेवारी पासून अशोक धोडी बेपत्ता होती. पालघर पोलीस गेल्या ११ दिवसांपासून धोडींचा तपास करत होती. अखेर गुजरात मधल्या भिलाड गावातल्या पाण्याने भरलेल्या खाणीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. अशोक धोडी यांचे २० जानेवारीला त्यांच्या कारसह अपहरण झाले होते. गाडी डहाणू रेल्वे स्थानक परिसरामध्ये लावून ते मुंबईला कामासाठी गेले होते. रात्री गाडी घेऊन गावाकडे परत येत असताना धोडींची कार एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. पण त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. घरच्यांनी शोध शोध केल्यानंतर सुद्धा अशोक धोडी सापडले नाहीत. त्यामुळे २१ तारखेला कुटुंबानं ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पालघर जिल्ह्यातल्या घोलवड पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवला गेला. सहा दिवसानंतर धोडी कुटुंबानं काही लोकांवर संशय व्यक्त केला.
अशोक धोडी यांचा सखा भाऊ अविनाश धोडी याच्यासह अन्य दोघांवर संशय असल्याचे कुटुंबानं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर २८ जानेवारीला अविनाश धोडीची घोलवड पोलिसांनी चौकशी सुरू केली. पण लघुशंकेचा बहाणा करत अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यातून निसटला. त्यानंतर पालघर पोलिसांनी सहा पथके तयार करत वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी पाठवली. पालघर पोलिसांनी त्याच रात्री आणखी चार संशयितांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या विशाल थोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुमाडा आणि संतोष धिंडे यांनी पोलिसांसमोर मोठे खुलासे केले. डहाणू तालुक्यातील झाई बोरगाव या डोंगराच्या वळणावर असलेल्या निर्जन स्थळावर धोडी यांच्या गाडीचा अपघात करण्यात आला. त्यानंतर त्यांच अपहरण करण्यात आलं. जमीन आणि संपत्तीच्या वादातून अशोक धोडी यांच अपहरण करून घातपात केल्याचा संशय आहे.
Published on: Feb 01, 2025 10:55 AM