शिवसेनेने उमेदवारी देऊनही मला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला:श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांची पराभवानंतर खंत व्यक्त
2 hours ago
1
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महायुतीचे शिवसेना उमेदवार म्हणून आपल्याला अधिकृत उमेदवारी दिली होती. त्यानंतर मला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापासून ते मतदानाच्या आदल्या रात्री माझ्यावरील गोळीबारापर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु संत-महंत यांचे आशीर्वाद आणि सर्वसामान्य जनता आपल्या पाठिशी उभे राहिल्याने अनेक संकटांना तोंड देत आपण ही निवडणूक लढवली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केले. श्रीरामपूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी या बैठकीत शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष डहाळे, संजय बाहुले, सागर कुदळे, शिवाजी सिनारे, दत्तात्रय शिंदे, हरिभाऊ तुवर, किशोर वाडीले, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते. याप्रसंगी कांबळे म्हणाले, या निवडणुकीत आपण एकाकी पडलो, अनेक संकटांना तोंड दिले. त्यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या संत-महंत, वारकरी संप्रदाय त्याचबरोबर सर्व शिवसेना व भाजप समर्पित कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शिवप्रहारचे पदाधिकारी, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी उभे राहिले. यापुढील काळातही श्रीरामपूर तालुक्यातील व राहुरी तालुक्यातील ३२ गावांमधील मतदार बंधू-भगिनींच्या आणि अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहील, असेही माजी आमदार कांबळे म्हणाले. उपस्थितांचे आभार शुभम ताके यांनी मानले. एकही नेता पाठीशी नसतना मिळाली दोन नंबरची मते महंत रामगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि एकही मोठा नेता आपल्या पाठीशी नसताना त्याचबरोबर कोणत्याही नेत्यांची एकही जाहीर सभा झालेली नव्हती. तरी सुद्धा श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात आपण एकाकी लढत देत दोन नंबरची मते मिळाली, असेही माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)