राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, यासाठी राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना, महाआरती करुन देवाला साकडं घालण्यात आले.Pudhari News network
Published on
:
26 Nov 2024, 5:34 am
Updated on
:
26 Nov 2024, 5:34 am
ठाणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, यासाठी राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना, महाआरती करुन देवाला साकडं घालण्यात आले. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, लाडक्या बहिणी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवाकडे प्रार्थना केली.
राज्यातील महिलांना स्वावलंबी करता यावे, यासाठी त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली. याच लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरुन यश टाकले. याचे पूर्ण श्रेय महायुतीचे कर्णधार म्हणून एकनाथ शिंदे यांना जाते. त्यामुळे ज्या भावाने आम्हाला स्वावलंबी बनवले तोच भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसावा, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींची इच्छा आहे, असे शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांनी सांगितले. यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांनी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणरायाची आरती केली आणि साकडं घातले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधीमुळे आजारातून बरे झालेल्या शेकडो रुग्णांनी तसेच
शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आज श्री सिद्धीविनायक मंदिरात सामूहिक प्रार्थना केली. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा शिंदे व्हावेत, अशी गणेशा चरणी मनोकामना केली.
ठाण्यात लाडक्या बहिणींकडून महाआरती
मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शेकडो लाडक्या बहिणींच्या हस्ते महाआरती करून देवाला साकडं घालण्यात आले. नाशिक येथील शिव मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा शिंदे व्हावेत, यासाठी पुजाअर्चा करण्यात आली. पंढरपुर येथे साधू संतानी विठ्ठल मंदिरात हवन करून शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना करण्यात आली.