बारामतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इच्छुकांचा उत्साह दुणावला!Pudhari News
Published on
:
26 Nov 2024, 7:19 am
Updated on
:
26 Nov 2024, 7:19 am
Baramati News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून विधानसभेला मोठा विजय मिळविल्याने आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचा उत्साह दुणावला आहे. या निवडणुका लवकर झाल्या तर सध्याच्या पोषक स्थितीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फायदा होईल अशी स्थिती सध्या बारामतीत आहे.
बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका गेली काही वर्षे रखडल्या आहेत. प्रशासकांच्या हाती कारभार गेला आहे. आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या निवडणुका होत नाहीत.
परंतु आता लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. केंद्रात एनडीए, तर राज्यात महायुतीची सत्ता आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाच्या प्रश्न निकाली निघाला तर या निवडणुका फेब्रूवारी, मार्चमध्ये होतील अशी चर्चा सध्या आहे.
लोकसभेला बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांना 48 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली होती. पक्षात नव्याने दाखल होणार्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढत चालली होती. त्याला अजित पवार यांच्या विधानसभेच्या मोठ्या विजयाने आता ब्रेक लागला आहे. अजित पवार यांनी लाखाहून अधिक मताधिक्य घेतल्याने आणि सत्तेत ते सहभागी होणार असल्याने साहजिकच सत्तेच्या बाजूने इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानेही यापूर्वीच ग्रामपंचायत ते लोकसभा या सगळ्या निवडणुका आम्ही लढवू असे जाहीर केले आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडे विचार न झाल्यास नाराज मंडळी लागलीच या गटाकडून तिकीट मिळवू शकतात. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी हे प्रमाण कमी राहिल,परंतु बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीचा विचार केल्यास इच्छुक इकडून तिकडे उड्या मारतील हे निश्चित.
अजित पवार यांचा विजय दमदार असला तरी नगरपरिषद निवडणुकीत बारामतीत तिकीट देताना त्यांची दमछाक होणार आहे. इथे 44 जागा आहेत. इच्छुकांची संख्या 300 च्या घरात आहे. त्यामुळे नाराजांना ते कसे थोपवतात, यावर सगळी गणिते आहेत. या उलट शरद पवार गटाकडे इच्छुकांची संख्या मर्यादित राहिल. परंतु समोरील गटातील नाराजांकडे त्यांची नजर असेल.
जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीचे 12 गण तालुक्यात आहेत. नगरपरिषद, नगरपंचायतीच्या तुलनेत जिल्हा परिषद, पंचायत समितीला अशा उड्या मारणे इच्छुकांसाठी आत्मघात असेल. त्यामुळे या निवडणुकीत तो प्रश्न फारसा येणार नाही.
बारामतीत केवळ 3 केंद्रांवर मविआला आघाडी
बारामती तालुक्यातील 386 मतदान केंद्रांपैकी फक्त 3 केंद्रांवर मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांना आघाडी मिळाली. अन्य 383 केंद्रांवर महायुतीचे उमेदवार अजित पवार यांना आघाडी मिळालेली आहे. बारामती शहरात तर अजित पवार यांना प्रत्येक केंद्रावर 80 टक्केपर्यंत मतदान झाले आहे. साहजिकच त्यांच्या पक्षाच्या इच्छुकांच्या दृष्टीने ही जमेची बाजू ठरणार आहे.
आघाडी-महायुतीवर गणिते
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आघाडी आणि महायुतीने एकत्र येऊन लढल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अद्याप या दोन्हींकडून कोणतीही भूमिका जाहीर झालेली नाही. या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या गेल्यास उमेदवारांची संख्या वाढेल, त्याचा फटका कोणाला बसेल, हे आत्ता तरी सांगणे अशक्य आहे.