पाचव्यांदा विजय मिळवत मंत्री छगन भुजबळ यांनी आपणच येवल्याचे बाहुबली असल्याचे सिद्ध केले आहे. Pudhari
Published on
:
26 Nov 2024, 9:32 am
Updated on
:
26 Nov 2024, 9:32 am
'मै सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड फेकोगे, चुन चुन कर आगे बढुंगा मैं' या ओळींना समर्पक विजय मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात खेचून आणला. या विजयाने येवल्यात आपणच बाहुबली असल्याचे त्यांनी पाचव्यांदा सिद्ध केले. विशेष म्हणजे भुजबळांना पराजित करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, मनोज जरांगे - पाटील यांनी जिवाचे रान केले होते. भुजबळांचा पराभव करण्यासाठी अनेक नेते सक्रिय होते. अगदी छोट्या गावांपासून ते मोठ्या गावापर्यंत अनेक नेते एकवटले होते. त्यामुळेच राज्यातच नव्हे तर देशाचे लक्ष येवल्याकडे लागले होते.
शांत - संयमी, मुत्सद्दी, हेविवेट नेते अशी ओळख निर्माण केलेले भुजबळ यांनी सलग पाचव्यांदा येवला - लासलगाव मतदारसंघात विजय मिळवित विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. पूर्वी मतदार सांगायचे की, या मतदारसंघात दोन वेळेपेक्षा जास्त वेळा कोणीही आमदार निवडून येत नाही. मात्र, भुजबळ यांनी विकासाच्या जोरावर याच मतदारसंघात आपली विययी घोडदौड सुरूच ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर मंत्री भुजबळ यांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केले होते. त्यात जरांगे - पाटील आणि भुजबळ यांची शाब्दिक चकमक संपूर्ण राज्याने पाहिली. त्यामुळे जरांगे समर्थक आणि स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक नेत्यांना भुजबळ यांनी मोठी - मोठी पदे बहाल केली मात्र, त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मंत्री भुजबळ यांना सोडले. मराठा समाजाचे नेते जरांगे व भुजबळ यांच्यात नेहमीच आराेप- प्रत्यारोप होत राहिल्याने मराठा समाजाची भुजबळांवर नाराजी दिसत होती. त्यामुळे भुजबळ यांना ही निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात होते. खुद्द शरद पवार यांनी भुजबळ यांच्याविरोधात येवला येथे सभा घेत माणिकराव शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यात निवडणुकीच्या तीन दिवस अगोदर जरांगे- पाटील यांनी अनेक गावांत रात्री उशिरापर्यंत रोड शो, सभा घेत भुजबळ यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मतदानाचा टक्का वाढताच अनेक राजकीय पंडितांनी भुजबळ यांचा पराभव निश्चित, तर मतदानाच्या दिवशी ४८ गावांतील १४ गावांत भुजबळ यांचे बूथसुद्धा लागलेले नाही, त्यांना प्रचंड विरोध असल्याचे स्थानिक नेते बोलत होते. 'बाहुबली तो गियो' अशा जोरदार चर्चा स्थानिक नेते करत होते. मात्र, भुजबळ यांनी त्यांच्या प्रत्येक सभेत विकासाच्या मुद्द्यावर जोर लावत मतदारांना आवाहन केले. त्यात महिलांचे वाढलेले मतदान हेही भुजबळ यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या निकालावरून मतदारांनी भुजबळ यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. यंदा भुजबळ यांना प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. माणिकराव शिंदे यांनी जोरदार टक्कर दिल्याने भुजबळांच्या मताधिक्यात घट झाल्याचे दिसले. मात्र, विजय हा विजयच असतो आणि तो मिळवून भुजबळांनी पुन्हा एकदा आपणच बाहुबली असल्याचे सिद्ध केले आहे.
- महिलांचे वाढलेले मतदान विजयाचे शिल्पकार
- विकासाच्या मुद्द्यावर जोर लावत मतदारांना आवाहन
- प्रचारात टीका करण्यापेक्षा केलेल्या कामावर चर्चा