शिरुर अनंतपाळ (Latur) :- सहा महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या औषधी भांडारला सोमवारी मध्यरात्रीनंतर शॉर्टसर्किटने (Short-circuit) आग लागली. यात लाखोंची औषधी जळून खाक झाली. सहा महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या नव्या कोऱ्या इमारतीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीला जबाबदार कोण हा सवाल यामुळे निर्माण झाला आहे.
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या औषधी खाक!
शिरुर आनंदपाल येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन सहा महिन्यापूर्वी थाटामाटात झाले. ही नवी कोरी इमारत असून या इमारतीत रुग्णालयाला लागणाऱ्या औषधांचे भांडार आहे. या औषधी भांडारला सोमवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्टसर्किटने लागली, असे सांगितले जाते. आग लागल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर हजर असलेले डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ अधीक्षक डॉ. पुरी व डॉ. देवंगरे यांच्याशी संपर्क साधून घडली घटना सांगितली. रुग्णालयातील रुग्णांना तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले व तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यावेळी औषधी (Medicine) भांड्याच्या रूमचे कुलूप तोडून आग आटोक्यात आणण्यात आली, अशी माहिती डॉ. पुरी यांनी दिली. या आगीत सर्व साहित्य, औषधी जळून खाक झाली.
अचानक शॉर्टसर्किट कसे झाले?
शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन होऊन सहा महिने सुद्धा झाले नाहीत. मग अचानक शॉर्टसर्किट कसे झाले? ही चूक कोणाची? ही बाब संशयास्पद आहे. याबाबत सिव्हिल सर्जन ढेले यांच्याशी संपर्क साधला असता शिरूर अनंतपाळचे औषध निर्माते एक महिन्यापासून मेडिकल रजेवर आहेत. त्यामुळे औषध भांडार चक्क बंदच आहे. त्यामुळे लातूर वरून टीम घेऊन पंचनाम्यासाठी येत आहोत, अशी माहिती ढेले यांनी दिली.