आपल्या आयुष्यात एक चारचाकी गाडी घेता यावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकांचं ते स्वप्न पूर्ण होतं. अनेकजण खूप मेहनत करुन, काबाडकष्ट करुन आपलं हे स्वप्न पूर्ण करतात. पण काही वेळेला आपण आपल्या मेहनतीच्या पैशांनी खरेदी केलेली चारचाकी गाडी चोरीला जाण्याचा धक्कादायक प्रकार घडतो. खूप प्रयत्न केल्यानंतरही आपल्याला गाडीचा शोध लागत नाही. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर खूप वेळ आपल्याला आपल्या गाडीची वाट पाहावी लागते. पण अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांची चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांच्याल गुन्हे शाखेला मोठं यश आलं आहे. आरोपी हे सॉफ्टवेअरच्या मदतीने गाडीचे लॉक खोलायचे आणि गाडीची चोरी करायचे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मोठं यश आलं आहे. पण या टोळीतील मुख्य आरोपींपर्यंत पोलीस अजून पोहोचलेले नाहीत.
नागपूर गुन्हे शाखा पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने चारचाकी वाहन चोरांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 11 चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपींकडून आतापर्यंत 1 कोटी 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही टोळी देशभरात सक्रिय असल्याची माहिती आहे. आरोपी दिल्ली, मणिपूर, नागालँड, आसाम, हैद्राबाद या ठिकाणी वाहन विकायचे. यामध्ये क्रेटा, किया या वाहनांचा देखील समावेश होता.
हे सुद्धा वाचा
आरोपी सॉफ्टवेअरच्या मदतीने गाडी सुरू करून त्या घेऊन जायचे. प्रत्येक राज्यात गेल्यानंतर गाडीची नंबर प्लेट बद्दलविली जायची. त्यांच्याकडे त्याच नंबरच्या गाडीचं डुप्लिकेट आरसी बुकसुद्धा असायचं. दिल्लीतून चोरलेली गाडी नागपुरात आणायची, नागपुरातून चोरलेली गाडी मणिपूर किंवा आसाममध्ये नेऊन विकायचे. ही टोळी हाय प्रोफाईल असून यात आतापर्यंत पोलिसांच्या हाती फक्त गाडी पोहचून देणारे आणि विक्री करणारे लागले आहेत. या टोळीचा मास्टर माईंडचा शोध पोलीस घेत आहेत.