Published on
:
26 Nov 2024, 3:27 pm
Updated on
:
26 Nov 2024, 3:27 pm
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील पराभवानंतर ईव्हीएमच्या विरोधात इंडिया आघाडीतील पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ईव्हीएमविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. राहुल गांधींनीही ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम विषयी सवाल केले आहेत. मात्र, अनेकवर्षांपासून काँग्रेसचा मित्रपक्ष राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने ईव्हीएमविरोधात आवाज उठवण्यास नकार दिला आहे. यामुळे इंडिया आघाडीत ईव्हीएम विरोधाच्या मुद्द्यावरुन एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना ईव्हीएमबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ईव्हीएमविषयीची सगळी माहिती समोर आली पाहिजे आणि शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. काँग्रेस आणि इतर सहकारी पक्षांनी एकत्र यावे, ईव्हीएम बद्दल दिवसभर सखोल चर्चा व्हावी आणि आवश्यक गोष्टी निवडणूक आयोगाच्या कानावर टाकाव्या, असे त्या म्हणाल्या. आम्ही पराभव मान्य करतो मात्र एवढ्या कमी जागा आम्हाला मान्य नाहीत. प्रत्यक्ष परिस्थिती अशी नव्हती, असे त्या म्हणाल्या. तसेच पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे आमच्या पक्षाचे नुकसान झाले, असा दावा त्यांनी केला. एकंदर ईव्हीएमविरोधात थेट भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली नाही. तसेच महाराष्ट्रातील निकालानंतर पहिली प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनीही ईव्हीएमविरोधात थेट प्रतिक्रिया दिली नाही.
काँग्रेसमध्येही ईव्हीएमविरोधावरुन एकमत नाही
ईव्हीएमचा विरोधामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. मात्र, काँग्रेस पक्षातही या मुद्द्यावरुन एकमत दिसत नाही. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले की, २००४ पासून ईव्हीएमवर निवडणूका लढवत आहे. मला वैयक्तिकरित्या कोणताही वाईट अनुभव नाही. तसेच कोणत्याही प्रकारची छेडछाड झाल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही, असे काँग्रेस खासदार म्हणाले. जोपर्यंत या विषयावर सबळ पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत या विषयावर आपले मत बदलणार नाही, असेही त्यांनी सांगितले. म्हणजे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व ईव्हीएमला विरोध करत आहे. मात्र, पक्षातील सर्व खासदारांचा आणि नेत्यांचा या मुद्द्याला पाठिंबा असेलच असे दिसत नाही.