Published on
:
26 Nov 2024, 3:15 pm
Updated on
:
26 Nov 2024, 3:15 pm
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सरकार स्थापन होण्यासाठी वेळ लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे दिल्लीत माध्यामांशी बोलत होते.
रावसाहेब दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणूक झाली तेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणे स्वाभाविक होते. मात्र मुख्यमंत्री कोण होणार, हे निवडणुकीनंतर ठरवू असेच आम्ही म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबद्दल त्यांना शब्द देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस शंभर टक्के मुख्यमंत्री व्हावेत कार्यकर्ता म्हणून आमची ती इच्छा आहे असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत : दानवे
रावसाहेब दानवे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही ईच्छा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत. भाजपने पक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच १००% टक्के मुख्यमंत्री व्हावेत, असे रावसाहेब दानवे म्हणाले. एक प्रकारे रावसाहेब दानवे यांनीही आपले समर्थन देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने दर्शवले.