Published on
:
26 Nov 2024, 4:24 pm
Updated on
:
26 Nov 2024, 4:24 pm
नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीत काँग्रेस विरोधी सूर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कामगिरीवर तृणमूल काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. इंडिया आघाडी पुढे नेण्यात काँग्रेस सातत्याने अपयशी ठरल्याचे तृणमूल काँग्रेसचे मत आहे. अशा स्थितीत आघाडीचे नेतृत्व तृणमूल काँग्रेसकडे देण्याचा विचार व्हायला हवा, अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने केली आहे.
ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व देण्याबाबत विचार केला पाहिजे, असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केले आहे. आघाडीसाठी काँग्रेस पक्षांतर्गत सातत्याने प्रयोग करत असल्याचे ते म्हणाले. पण त्यांचा प्रत्येक प्रयोग फसत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसकडून खूप अपेक्षा होत्या, पण तिथेही पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र आजपर्यंत आघाडीला कोणतेही ठोस आव्हान देता आलेले नाही.
काँग्रेस केवळ अपयशी ठरली नाही, तर शरद पवारही महाराष्ट्राच्या निवडणुकीत पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असे कल्याण बॅनर्जी म्हणाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे घराणेशाहीचे नेते आहेत. ममता बॅनर्जी या एकमेव नेत्या आहेत ज्यांनी पक्षाची स्थापना करून पक्षाला शिखरावर नेले आहे. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. सात वेळा लोकसभेचे सदस्य राहिल्या आहेत. केंद्र सरकारमध्ये मंत्री असण्यासोबतच त्या तीन वेळा मुख्यमंत्रीही होत्या. अशा स्थितीत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाचा विचार केला पाहिजे. आपल्या राजकीय अनुभवाच्या आधारे आपण हे बोलले असल्याचे ते म्हणाले. शेवटी त्यांनी सांगितले की, हे माझे वैयक्तिक मत आहे, पक्षाची अधिकृत भूमिका नाही.