महाविकास आघाडी ईव्हीएम मशीनविरोधात एल्गार पुकारणार? अनेक ठिकाणचे निकाल धक्कादायक असल्याची तक्रार

2 hours ago 1

महाविकास आघाडी आता ईव्हीएम मशीनविरोधात एल्गार पुकारण्याची शक्यता आहे. अनेक मतदारसंघातले निकाल धक्कादायक असल्याची तक्रार घेवून उमेदवार शरद पवारांकडे दाखल झाल्यानंतर वकिलांची टीम तयार करण्याचे निर्देश शरद पवारांनी दिले आहेत. कुणीही मागे हटू नका असं सांगत ठाकरे गट आणि काँग्रेसनंही ईव्हीएमच्या विश्वासर्हतेवर बोट ठेवलंय. पोस्टल आणि ईव्हीएम मशीनमधल्या मतांच्या फरकावरूनही विविध चर्चा रंगत आहेत. लोकमत समुहाचे करण दर्डांनी ट्विट केलेल्या आकडेवारीत पोस्टल मतांची सरासरी काढल्यास मविआ पुढे दिसते. मात्र ईव्हीएम मोजणीत महायुती पुढे गेलीय. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या नोकरदार वर्गासाठी पोस्टल मतांची सुविधा असते. त्यांना जुन्या पद्धतीनुसार पेनानं नावापुढे टिकमार्क करुन मतदान करावं लागतं. तर ईव्हीएममध्ये बटण दाबून मतदान होतं.

महायुतीत भाजपला पोस्टल मतांची टक्केवारी 56.37 टक्के आहे. तर ईव्हीएममध्ये 89.26 टक्के आहे. शिंदेंच्या शिवसेनेला पोस्टलमध्ये 35.80 टक्के, तर ईव्हीएममध्ये 70.37 टक्के आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीला पोस्टल मतांमध्ये 40.67 टक्के, ईव्हीएममध्ये 69.49 टक्के मते मिळाली आहेत. तर मविआत काँग्रेसला पोस्टल मतांत 55.44 टक्के मतं आहेत, ईव्हीएममध्ये 14.85 टक्के मिळाली आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला 38.94 टक्के पोस्टल मतं आहेत, ईव्हीएममध्ये 21.05 टक्के मतं मिळाली आहेत, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पोस्टल मतं 46.51 टक्के आहेत. आणि ईव्हीएमची टक्केवारी 11.62 टक्के मतं आहेत.

पोस्टल मतांमध्ये किती उमेदवार आघाडीवर?

भाजपनं 149 जागा लढवल्या, त्यापैकी पोस्टल मतांमध्ये 84 उमेदवार आघाडीवर आहेत. शिंदेंच्या 81 लढलेल्या जागांपैकी 29 पोस्टल मतांमध्ये पुढे आहेत. तर दादांच्या 59 पैकी 24 उमदेवारांना पोस्टल मतांमध्ये लीड मिळालंय. मविआत काँग्रेसनं लढवलेल्या 101 जागांपैकी 56 ठिकाणी पोस्टलमध्ये उमेदवार पुढे आहेत. ठाकरेंच्या 95 जागांपैकी 36 जागी पोस्टल मतांमध्ये आघाडी आहे. तर शरद पवारांनी लढवलेल्या 86 पैकी 40 जागांवर पोस्टल मतांमध्ये उमेदवारांना आघाडी आहे.

आकड्यांमध्ये तफावत?

वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 288 पैकी 95 मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममध्ये झालेलं मतदान यात तफावत समोर आलीय. 76 मतदारसंघात 20 तारखेला जितकं मतदान झालं. त्याहून कमी मतं निकालाच्या दिवशी ईव्हीएममध्ये निघाली. तर 19 मतदारसंघात जितकं मतदान झालं होतं, त्याहून जास्त मतं ईव्हीएममधून मोजली गेली आहेत, असा एकूण 95 मतदारसंघात मतदानाच्या आकड्यांत तफावत आहे.

मविआनं कन्नडमधल्या तळनेर गावातलं एक उदाहरण देत प्रश्न विचारले आहेत. या गावात 396 मतदारांपैकी एकूण 312 मतदान झालं. त्यात ठाकरे गटाला 194, शिंदे गटाला 326 आणि अपक्ष हर्षवर्धन जाधवांना 104 मतं पडली आहेत. जर गावात एकूण मतदान 312 झालंय, तर 624 मतं कुठून आली? लवकरच असे प्रकार उघड आणू, असंही जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

नाशिक जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना जवळपास सारखीच मतं कशी पडली? याची आकडेवारी टाकत रोहित पवारांनी सवाल केलाय. पाहा नेमकी आकडेवारी काय टाकली:

  • नांदगावात सुहास कांदेंना 1 लाख 38 हजार 68 मतं पडली आहेत.
  • सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटेंना १ लाख 38 हजार 565 मते
  • दिंडोरीत झिरवाळांना १ लाख 38 हजार 622 मते
  • येवल्यात भुजबळांना १ लाख 35 हजार 23 मतं पडली आहेत.
  • इगतपुरीत खोसकरांना 1 लाख 17 हजार 575
  • कळवणमध्ये नितीन पवारांना 1 लाख 19 हजार 191
  • निफाडमध्ये दिलीप बनकरांना १ लाख 20 हजार 253
  • नाशिक पूर्वेत राहुल ढिकलेंना 1 लाख 56 हजार 246
  • मालेगावात दादा भुसेंना १ लाख 58 हजार 284
  • बागलणानमध्ये दिलीप बोरसेंना 1 लाख 59 हजार 681 मतं पडली आहेत.

मावळच्या मतदानाच्या आकड्यांवरही शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतलाय. खुद्द अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल शेळकेंना विजयाची खात्री नव्हती, असं अजित पवारांनी म्हटलं. मात्र सुनिल शेळके १ लाख ८ हजार मतांनी निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदनही केलंय.

दहिसरमधले मनसेचे पराभूत उमेदवार यांनीही ईव्हीएमवर संशय घेत मोठा आरोप केलाय. आपण ज्या प्रभागात राहतो तिथं १ हजार मतांमध्ये फक्त दोनच मतं कशी मिळाली. घरात पत्नी आणि आईनं सुद्धा मला मतदान दिलं नाही का? असा प्रश्न मनसेच्या राजेश येरुणकर यांनी विचारलाय.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article