मुंबई महापालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी मंगळवार, 10 डिसेंबरला परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांच्या नोंदणीकृत ई- मेल तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रवेशपत्राबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी वेळापत्रकानुसार संबंधित पेंद्रावर निश्चित वेळेत उपस्थित राहावे, असे पालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक संवर्गातील 178 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून 19 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. आतापर्यंत एकूण 25 हजार 475 अर्ज महापालिकेला प्राप्त झाले आहेत.
तीन सत्रांत होणार परीक्षा
पात्र उमेदवारांसाठी 10 डिसेंबरला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी सकाळी 9 ते 11, दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना उमेदवारांच्या नोंदणीकृत ‘ई-मेल’ वर तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे कळवण्यात येणार आहेत.