एस्सार समूहाचे सहसंस्थापक आणि उद्योजक शशिकांत रुईया (80) यांचे सोमकारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिकार आहे.
शशी रुईया यांनी वडील नंदकिशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली कारकीर्दीची सुरुवात करत 1969 मध्ये भावाबरोबर एस्सारची पायाभरणी केली. त्यांनी मद्रास बंदर न्यासाकडून अडीच कोटी रुपयांचा कार्यादेशही पटकावला. एस्सारने पुढे अनेक पूल, धरणे आणि वीज प्रकल्प उभारले. त्याचबरोबर तेल आणि कायू मालमत्तांच्या संपादनासह ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष पोलाद आणि दूरसंचार क्षेत्राकडे वळवले. रुईया ‘फिक्की’च्या व्यवस्थापकिय समितीचे सदस्य होते. त्याचबरोबर हिंदुस्थान -अमेरिका संयुक्त व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. ते ‘इंडियन नॅशनल शिपओनर्स असोसिएशन’चे माजी अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या ‘इंडो-यूएस सीईओ फोरम’ आणि ‘इंडिया-जपान बिझनेस कौन्सिल’चे सदस्यदेखील होते.