Published on
:
27 Nov 2024, 12:14 am
Updated on
:
27 Nov 2024, 12:14 am
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 470 एकर येथील जागेत प्रशासकीय भवन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्याचे, सुशाभीकरणाचे काम सुरू आहे. दोन वर्षे झाली अद्याप काम पूर्ण झाले नाही. कासवगतीने काम सुरू आहे. प्रशासकीय भवन, अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम संपत नाही. त्यामुळे संघटना, शैक्षणिक वर्तुळातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास विद्यापीठात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तत्कालीन कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या काळात उद्घाटन होणार होते. मात्र, त्यानंतर नवे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांना येऊनही वर्ष उलटले. तरीही काम झाले नाही. फडणवीस यांच्या काळात प्रशासकीय भवन, परीक्षा भवनचे काम जोरात सुरू होते. डिसेंबरमध्येच काम 90 टक्के झाले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये उद्घाटन करणार होते. मात्र, काम पूर्ण झाले नाही. किरकोळ इलेक्ट्रीक, फर्निचर यासह विविध कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. नवे वर्ष आले तरी अद्याप 90 टक्के काम झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगितले जाते. यंदाच्या वर्षी तर काम पूर्ण होवून प्रशासकीय, परीक्षा भवन त्याठिकाणी शिफ्ट होणार का, आणखी सहा महिने वाट पाहावी लागणार अशीच चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
विद्यापीठाचे प्रशासकीय भवन, अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम 90 टक्के झाले आहे. काही किरकोळ कामे बाकी आहेत. ती लवकर पूर्ण होतील. मार्चपर्यंत प्रशासकीय भवन, अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन होईल. त्यानंतर नवीन इमारतीत कामकाज चालेल.
- योगिनी घारे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर