Published on
:
27 Nov 2024, 2:02 am
Updated on
:
27 Nov 2024, 2:02 am
सांगली ः विधानसभेच्या निवडणुकीमुळे गेल्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी आणि नागरिकांची वर्दळ घटली होती. मात्र आचारसंहिता शिथिल झाल्याने कर्मचार्यांची उपस्थिती वाढली आहे. लोकांचीही वर्दळ वाढली आहे. मात्र अजूनही अनेक टेबलांवर निवडणूक आणि निकालाचीच चर्चा दिसते आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली. त्यानंतर विविध शासकीय कामकाजावरही निर्बंध आले होते. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. निवडणूक आचारसंहितेमुळे शासकीय कार्यालयाच्या कामकाजावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे कार्यालयात कामानिमित्त येणार्या लोकांचीही वर्दळ घटली होती. तसेच कार्यालयात उपलब्ध असणार्या कर्मचार्यांवरच कार्यालयीन कामकाज सुरू होते. त्यामुळे शासकीय कार्यालयात गेल्या दीड महिन्यापासून शुकशुकाट जाणवत होता. आचारसंहिता सोमवारी शिथिल झाल्याने शासकीय कार्यालये अधिकारी, कर्मचारी आणि लोकांच्या गर्दीने गजबजली आहेत. तसेच कामानिमित्त येणार्या लोकांचीही गर्दी वाढली आहे. प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी अधिकार्यांकडून बैठका घेण्यात येत आहेत.