नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या चिंतन बैठकीत मार्गदर्शन करताना उपनेते सुनील बागूल, समवेत व्यासपीठावर बबन घोलप, दत्ता गायकवाड आदी.FILE
Published on
:
27 Nov 2024, 4:53 am
Updated on
:
27 Nov 2024, 4:53 am
नाशिक : लोकसभा निवडणुकीत झालेल्या देदीप्यमान विजयानंतर अनुकूल परिस्थिती असतानाही विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश अनाकलनीय असल्याचा दावा करत शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमधील पराभवाचे खापर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटावर फोडले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असहकार्य, ईव्हीएमचा गफला, पक्षातीलच काही लोकांनी केलेली गद्दारी, प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून निवडणुकीत पैशांचा पडलेला पाऊस, भाजपतर्फे शासकीय यंत्रणेचा करण्यात आलेला पुरेपूर वापर आणि कुटनीती यामुळे आपल्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा निष्कर्ष ठाकरे गटाच्या चिंतन बैठकीत काढण्यात आला.
* पक्षातील गद्दारांवरही व्यक्त केला संताप
* ईव्हीएममधील गफल्यावरही चर्चा
* शासकीय यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप
* प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून पैशाचा महापूर : टीका
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. शहरातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य व नाशिक पश्चिम या तिन्ही मतदारसंघांत ठाकरे गटाच्या उमेदवारांना मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवाची कारणमीमांसा ठाकरे गटाकडून सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात उपनेते बबन घोलप, सुनील बागूल व सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चिंतन बैठक मंगळवारी (दि. २६) पार पडली. लोकसभेतील घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव का झाला, याविषयी चिंतन करताना पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उमेदवारांसाठी अनुकूल वातावरण होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आदींच्या सभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. असे असूनही अपयश पदरी पडत असेल, तर ही बाब निश्चितच गंभीर म्हणावी लागेल. पराभवाच्या नेमक्या कारणांचा शोध घेऊन आपणास आतापासूनच सावध राहण्याची गरज आहे. तसेच आगळी रणनीती आखून आगामी महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना समर्थपणे सामोरे जावे लागेल आणि त्यादृष्टीने आतापासूनच सर्वांनी जोमाने कामास लागावे, असे आवाहन उपनेते घोलप, बागूल आणि गायकवाड यांनी यावेळी केले.
व्यासपीठावर नाशिक लोकसभा संघटक बाळासाहेब पाठक, समन्वयक निवृत्ती जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, बाळकृष्ण शिरसाट, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी महापौर यतीन वाघ, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, मामा राजवाडे, गुलाब भोये, निवृत्ती लांबे आदी यावेळी उपस्थित होते.
मनपा निवडणुकीसाठी सज्ज व्हा
महापालिका निवडणुकीची तयारी आतापासूनच करण्याचे आदेश ठाकरे गटाच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आले. राज्य संघटक विनायक पांडे, महानगरप्रमुख विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी यांनीही यावेळी मार्गदर्शन करून आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका जिंकायच्याच असा निर्धार करून रिंगणात उतरण्याच्या सूचना केल्या.