Published on
:
27 Nov 2024, 7:26 am
Updated on
:
27 Nov 2024, 7:26 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगला देशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ल्यांविरुद्ध शांततेच्या मार्गाने आवाज उठवणारे धर्मगुरू तसेच इस्कॉनचे एक संत चिन्मय प्रभू यांना बांगला देशातील मोहम्मद युनूस सरकारने देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली. चिन्मय प्रभूना चितगाव न्यायालयात मंगळवारी हजर करण्यात आले; पण जामीन दिला नाही. न्यायालयात जमलेल्या हिंदूंवरही पोलिसांनी लाठीमार केला. अहिंसेची शिकवण देणाऱ्या संतांना अटक करता आणि जामीनही देत नाही म्हणून हिंदू समर्थकांनी न्यायालयाबाहेर निदर्शने सुरू केली होती. यादरम्यानच्या हिंसाचारात एका वकिलाचा मृत्यू झाला. सैफुल इस्लाम, असे मृत सहायक सरकारी वकिलाचे नाव आहे.
सैफुल इस्लाम यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्थानिक बंगाली वृत्तपत्र प्रथम आलोनुसार, घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, वकिलाच्या मृत्यूपूर्वी त्यांना आंदोलकांनी बेदम मारहाण केली होती. चटगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी सांगितले की, चितगाव येथील वकील आरिफ यांची हत्या करण्यात आली आहे. मात्र, हत्येमागचा हेतू स्पष्ट झालेला नाही. बार असोसिएशनचे सरचिटणीस अशरफ हुसैन रज्जाक यांनी सांगितले की, आरिफ यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ बार असोसिएशनने बुधवारी न्यायालयीन कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेख हसिना यांचे सरकार उलथवल्यानंतर बांगला देशात हिंदूंविरुद्ध झालेल्या भयावह हिंसाचाराविरुद्ध चिन्मय प्रभू यांनी शांततामय मागनि हिंदूंचा मोर्चा काढला होता. हिंसाचाराच्या घटनांनंतर ते याविरोधात सातत्याने पुढाकार घेत आले. त्यामुळे खवळलेल्या फिरोज खान या सत्ताधारी बीएनपी पक्षाच्या नेत्याने चितगावात चिन्मय प्रभूविरोधात राजद्रोहाची व राष्ट्रध्वजाच्या अवमानाची तक्रार दिली होती. या जुन्या तक्रारीच्या आधारावर व त्याला कुठलाही आधार नसताना चिन्मय प्रधूंना सोमवारी पोलिसांनी अटक केली. हिंदू समाजाचे लोक त्यामुळे रस्त्यावर उतरले. यावेळीही बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंवर सशस्त्र हल्ला केला होता. त्यात जवळपास ५० हिंदू जखमी झाले आहेत; पण खचून न जाता या हल्ल्याविरोधातही हिंदूंनी हजारोंच्या संख्येने 'जय सिया राम' आणि 'हर हर महादेव'च्या घोषणांसह मौलवी बाजारात विशाल मशाल मोर्चा काढला.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी केले असून, बांगला देशात हिंदूंवर हल्ले करणारे गुन्हेगार मोकाट आहेत; पण अहिंसेची शिकवण देणाऱ्या एका हिंदू संताला अटक करण्यात आली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे भारताने या निवेदनात म्हटलेले आहे.
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी अशी चिन्मय प्रभूची संपूर्ण धार्मिक ओळख आहे. इस्कॉनच्या चितगाव पुंडरीक धामचे ते अध्यक्ष आहेत. • ते बांगला देशातील प्रमुख हिंदू धार्मिक नेते आहेत. बांगला देश सनातन जागरण मंचचेही ते प्रमुख आहेत. बांगला देशात इस्कॉनची ७७ मंदिरे आणि ५० हजारांवर सदस्य आहेत.